शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मात्र, कुठेही संजय शिरसाट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंनी न्यायालयात धाव घेतली आहे. अंधारेंनी पुणे न्यायालयात शिरसाटांविरुद्ध तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. यानंतर ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना अंधारेंनी शिरसाटांवर टीका केली आहे.
“शिरसाटांविरोधात परळी, संभाजीनगर आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न केले. पण, कोठेही गुन्हा नोंद करून घेण्यात आला नाही. सत्ताधारी पक्षातील शीतल म्हात्रे प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करत, काहींना अटक करण्यात आली. गणेश बीडकर यांचा डान्सबारमधील व्हिडीओ व्हायरल झाला. नुसते त्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला,” असे सुषमा अंधारेंनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे स्टंटबाजी करतात, असे संजय शिरसाट म्हणाले. याबाबत विचारले असता सुषमा अंधारेंनी सांगितले, “अडगळीत पडलेल्या शिरसाटांना कोणी ओळखत नव्हते. शिरसाट हे नावसुद्धा कोणाला माहिती नव्हते. पण, माझ्याबरोबर नाव चर्चेत आल्याने शिरसाटांना लोक ओळखत आहेत. आमदार असूनसुद्धा त्यांना गल्लीतले काळ कुत्रेही विचारत नव्हते. मला स्टंट करायचा असता किंवा आर्थिक लाभ पाहिजे असता, तर लाखो – कोटी रुपयांची मागणी केली असती. फक्त तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा करत आहे.”
अब्रुनुकसानीचा दावा करू द्या अथवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ द्या, त्याची काळजी करत नाही, असे शिरसाटांनी म्हटले आहे. त्याबद्दल विचारले असता सुषमा अंधारे म्हणाल्या, “हा त्यांचा उद्दामपणा आणि अहंकार आहे. त्यांना खात्री आहे, काहीही झाले, तरी एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना वाचवणार आहेत. हा अहंकाराचा फणा ठेचण्यासाठीच लढा देत आहे.”