ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्ड क्रमांक १६ मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेला नऊ दिवसांचा कालावधी झाला. मात्र अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला. अशातच आरोपी ललित पाटील, मंत्री दादा भुसे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “ललित पाटील कोण माणूस आहे हे मला माहिती नाही, असं मंत्री दादा भुसे सांगतात. मात्र, कालच एक फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो मातोश्रीवरील आहे. त्या फोटोत अर्थात उद्धव ठाकरेही आहेत. परंतू त्या उद्धव ठाकरे मातोश्रीवर असणं अत्यंत स्वाभाविक आहे. मातोश्रीवर पद्ध अशी आहे की, एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातून येते त्या जिल्ह्यातील मोठा नेता किंवा अधिकृत व्यक्ती त्या व्यक्तीला घेऊन येते. याचा अर्थ ललित पाटीलला दादा भुसेच मातोश्रीवर घेऊन आले होते.”
“…तेव्हा एकनाथ शिंदेंच्या मार्फत अनिल जयसिंगानी मातोश्रीवर आले होते”
“असाच एक फोटो मागे अनिल जयसिंगानी प्रकरणातही समोर आला होता. त्या मातोश्रीवरील फोटोवरही मी असं म्हटलं होतं की, त्यावेळचे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख कोण होते हे पाहा. ते ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून आले होते, म्हणजेच तेव्हा एकनाथ शिंदेंच्या मार्फत अनिल जयसिंगानी मातोश्रीवर आले होते,” असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.
हेही वाचा : Sushma Andhare: ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्याकरता दादा भुसेंचा फोन?; सुषमा अंधारेंचा थेट आरोप
“श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबद्दल तेव्हाही कागदपत्रांसह बोलले होते, मी आत्ताही…”
“मी तर गोल बिल्डिंगमधील श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबद्दल तेव्हाही कागदपत्रांसह बोलले होते. मी आत्ताही माझा विवेक जागा ठेवत कुठल्याही शब्दांचा फेरफार न करता, शब्दच्छल न करता, कुठलेही आढेवेढे न घेता मी पुन्हा शांतपणे सांगते आहे की, ससूनचे आधीचे अधिष्टाता काळे, आताचे अधिष्टाता ठाकूर, ललित पाटलावर उपचार करणारे डॉक्टर, कर्मचारी या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली.