राज्यपाल या घटनात्मक पदबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. पण, या पदावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जेव्हा-जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखले नाही. आमच्या ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही. महापुरुषांच्या बदनामीचे सुनियोजित षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृवात सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे: भरभराटीसाठी काँग्रेस भवनमध्ये होमहवन?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी सर्वधर्मीय पुणेकर शिवप्रेमींच्या वतीने  पुणे बंदचे आवाहन करण्यात आले होते. यानिमित्ताने मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चाची लाल महाल येथे सभेने सांगता झाली. त्यावेळी अंधारे बोलत होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी लाल महाल येथे येऊन अभिवादन केले. मात्र, निषेध सभेमध्ये ते अनुपस्थित होते.

महापुरुषांचा अवमान होत असल्याबद्दल उद्विग्न होऊन कदाचित राजीनामा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीला गेले असतील, अशी टिप्पणी करून अंधारे म्हणाल्या, उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहाटीला, गावे कर्नाटकात आणि आपण आज लाल महालात, असेही अंधारे यांनी नमूद केले. तसेच एकनाथभाऊ बाजूला बसले असून महाराष्ट्राचे स्टिअरिंग देवेंद्रजींच्या हातात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदी यांना रावण म्हटल्यानंतर त्यांच्याविरोधात बोलण्यासाठी देवेंद्रजी हिरीरीने पुढे आले. पण, महापुरुषांचा अवमान होतो तेव्हा चकार शब्दही बोलत नाहीत. राज्यपालांना परत बोलवा, असे पत्रही महाशक्तीला पाठवत नाहीत. त्यांच्याविरोधात निंदाजनक ठरावही विधीमंडळात मांडला जात नाही, असे मुद्दे अंधारे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा- पुणे : आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड; ‘वाट बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या अध्यक्षासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा

शाईफेक झाल्यानंतर हे सुनियोजित षडयंत्र असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर ‘होय, हे भाजपमधील बहुजन नेत्यांविरोधात त्याच पक्षातील मनुवादी नेत्यांचे षडयंत्र असल्याची टिप्पणी अंधारे यांनी केली. विनोद तावडे सुटले. बिचारे चंद्रशेखर बावनकुळे अडकले आहेत, असा दावा त्यांनी केला. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोनिया गांधी यांनी माफ केले. तुमच्यावर शाई फेकणाऱ्यावर तुम्ही खुनाचे कलम लावले. दादा, तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारू नयेत. महाराष्ट्राचा आक्रोश जनता तुम्हाला मतपेटातून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अंधारे यांनी दिला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticize devendra fadnavis over governer bhagat singh koshyari statement on chatrapati shivaji maharaj pune print news spt 17 dpj