पुणे : “शिंदे गटाचे आमदार शिरसाठ यांच्याकडून महिलांविरोधात सतत बेताल वक्तव्य होत आहे. त्याविरोधात राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला जावा आणि शिरसाठ यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयामध्ये दाखल करणार,” अशी भूमिका ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुषमा अंधारे म्हणाल्या की, आमदार संजय शिरसाट यांच्या बेताल वक्तव्याबाबत राज्यभरातील आमचे पदाधिकारी ठिकठिकाणी पोलीस ठाण्यात जात आहेत. पण पोलीस कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद देत नाही. पोलीस यंत्रणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसर्‍या बाजूला अमृता फडणवीस आणि शितल म्हात्रे यांच्याबद्दल प्रकरण समोर आल्यावर पुढील काही मिनिटांत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. पण मागील काही दिवसांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ एका महिलेबाबत वारंवार बेताल वक्तव्य करत आहेत. पण हे सरकार कोणत्याही प्रकारची पावले उचलत नाही. त्या घडामोडीदरम्यान महिला आयोगाने दखल घेतल्यावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची समिती नेमण्यात आली आहे. पण ही समिती वेळकाढूपणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता न्यायालयामध्ये दावा दाखल करणार आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल. संजय शिरसाठ यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

हेही वाचा – पुणे : आठ वर्षांच्या मुलाला धमकावून दोन महिने अत्याचार; दत्तवाडी पोलिसांकडून तिघांना अटक

हेही वाचा – टिंडर डेटिंग ॲपवरून ओळख.. अभियंता तरुणीवर अत्याचार, मारहाण करून डोळा फोडला

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यामागे एकच हेतू आहे. तो म्हणजे, महिलांबद्दल शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार, आमदार गुलाबराव पाटील यांच्यासारखे नेते बेताल वक्तव्य करीत आहेत. या नेत्यांना चाप बसावा, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

तीन रुपयांचाच अब्रुनुकसानीचा दावा का?

“मी एक मध्यमवर्गीय असून, अब्रूशिवाय दुसरे काही जपायला आमच्याकडे नाही. तसेच अब्रूची किंमत कशातच करता येत नाही. ती लाखो कोटी रुपयांमध्येही होत नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणत्याही आर्थिक लाभात किंवा स्टंटबाजीमध्ये पडायचे नाही. पण मी भटक्या विमुक्तमधून येते. आमच्याकडे एक स्वतंत्र न्याय व्यवस्था चालते. त्यामध्ये महिलांचा अवमान सर्वात गहन अपराध समजला जातो. त्यामध्ये शिक्षा म्हणून तीन रुपयांचा दंड ठोठावला जातो. ती शिक्षा ठोठावल्यानंतर संबधित आरोपीला जनावर म्हणून ओळखले जाते”, अशी तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीमागील महत्त्वाची बाब सुषमा अंधारे यांनी सांगितली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare of the thackeray group said that she will file defamation suit for damage of three rupees against mla sanjay shirsat svk 88 ssb
Show comments