Sushma Andhare : लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. त्यावेळी माझ्याकडून थोडी चूक झाली. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. अशी कबुली काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यांच्या कबुलीनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या अजित पवारांच्या या विधानावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुषमा अंधारे या पुणे दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना अजित पवार यांनी केलेल्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, वरातीमागून घोडे नेण्यात काहीच अर्थ नसतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Ajit Pawar on Supriya Sule : अजित पवारांना चूक मान्य, “सुप्रियाविरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, कारण…”

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

“अजित पवार जे काही बोलले, हा दोन कुटुंबाचा आणि दोन पक्षांचा प्रश्न आहे. मला त्यावर जास्त काही बोलायचं नाही. पण वरातीमागून घोडे नेण्यात काहीच अर्थ नसतो. वेळ गेल्यावर जे सुचतं त्याला मनाचा मोठेपणा म्हणता येणार नाही. काल अजित पवार यांनी जे काही विधान केलं त्यानंतर अनेकांनी हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे वगैरे म्हटलं, पण ही तीच लोक होती, जी लोकसभा निवडणुकीपूर्वी खालच्या पातळीवर जाऊन सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करत होती”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“…म्हणून त्यांना शहाणपण सुचलं”

“लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. हा रोष आगामी निवडणुकीतही बघायला मिळू शकतो, असं लक्षात आल्याने त्यांना शहाणपण सुचलं आहे. त्याला काहीही अर्थ नाही. हे त्यांना तेव्हा सुचायला पाहिजे होतं, जेव्हा रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांच्यासारखी लोक खालच्या पातळीवर जाऊ सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलत होती”, अशी प्रतिक्रियाही सुषमा अंधारे यांनी दिली.

हेही वाचा – Sushma Andhare : “विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवले”, सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारवर आरोप; म्हणाल्या…

“असा कोणता पार्लमेंट्री बोर्ड असतो, जो…”

दरम्यान, बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी उभं करण्याचा निर्णय पार्लमेंट्री बोर्डाचा होता, असंही अजित पवार म्हणाले होते. यासंदर्भात विचारलं असता, “असा कोणता पार्लमेंट्री बोर्ड असतो, जो सातत्याने कुटुंबातल्या लोकांनाच निडणुकीचं तिकीट द्या किंवा राज्यसभा द्या, असं सांगतो आणि जो छगन भुजबळांसारख्या लोकांना काहीच देऊ देत नाही. असा हा पार्लमेंट्री बोर्ड माझ्या आकलनाबाहेर आहे”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare on ajit pawar supriya sule sunetra pawar baramati election spb