पुण्यातील पोलिसांच्या वॅनचा एक व्हिडीओ पोस्ट करून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृहखात्याची झोप उडवली आहे. काही तरुण पोलिसांना काही पाकिटं देतात असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं जातंय. ललित पाटील प्रकरणामुळे गृहखातं टार्गेट झालेलं असताना आता पुन्हा एकदा या व्हिडीओमुळे गृहमंत्र्यांच्या कार्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सुषमा अंधारे यांनी याबाबत टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला.
पुण्यात ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याच ठिकाणी उभं राहून सुषमा अंधारे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, हा जेल परिसर आहे. इथून २०० मीटर अंतरावर जेल आहे. बाजूला जात पडताळणी केंद्र आहे. पुढे महिला सुधारगृह आहे. या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही नाही. मुद्दा हा आहे की तुरुंगातील कैद्यांना भेटायला त्यांचे साथीदार जाणार असतील, वाईट प्रवृत्तीचे लोक येथे वावरणार असतील, या रस्त्यावर अनुचित प्रकार घडला तर सीसीटीव्ही कुठे आहे? इथं का सीसीटीव्ही नाहीय? त्यामुळे येथे बस लावली गेली. जेणेकरून सामान्य नागरिकांना वाटेल की कैदी बाथरुमसाठी थांबले असतील.
हेही वाचा >> Video: “उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली”, ‘तो’ व्हिडीओ पोस्ट करत सुषमा अंधारेंचा खोचक टोला!
“या व्हिडीओत दिसतंय त्याप्रमाणे गाडी येते आणि थांबते. टू व्हिलरवरून दोन लोक येतात, एक मुलगा खाली उतरतो. तिथून एक पोलीस अधिकारी उतरतो, त्या पोलीस अधिकाऱ्याशी तो मुलगा बोलते. मागे जातो, वॅनच्या मागच्या दरवाजाजवळ येतो. पण वॅनच्या आतला पोलीस दरवाजा उघडत नाही. तो पुढे पुन्हा जातो, त्यांच्यात काही देवघेव होते. मागचा पोलिसही दरवाजा उघडतो. पाकिटे,पिशव्या आत जातात. पाकिटे पिशव्या द्यायच्याच होत्या तर कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन द्यायच्या होत्या. इथं द्यायला कोणी परवानगी दिली? इथं का दिली गेली? ही छोटी पाकिटे होती, म्हणजे यात कैद्यांची कपडे तर नव्हते. मग एवढ्या छोट्या पाकिटातून काय दिलं, हे कळलं पाहिजे. जे कोणी अधिकारी आहेत, त्यांच्या फक्त चौकशा होऊन चालत नाही. कायद्याचे तीन तेरा वाजले जातात. अब्रुनुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सर्व मंत्री, आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का? तुमच्या अब्रुची लक्तरे संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“ललित पाटील फरार होतो. ललित पाटील म्हणतो, मी पळून गेलो नाही, मला पळून लावलं. ज्यांनी पळवलं त्यापैकी एकजण सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो. त्याला सस्पेंड केलं जातं. लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. पुणे स्मार्ट सिटी आहे. मग इतक्या संवदेनशील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे का नाहीत. एखाद्या मायमाऊलीची छेड काढली गेली, चमकमक उडाली तर? मग सीसीटीव्ही का लावले नाहीत? याची चौकशी झाली पाहिजे”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
“या प्रकरणातील अधिकाऱ्यांना ओळखा. त्यांना ओळखणं फार अवघड काम नाहीय. सगळं मीच करायचं असेल तर गृहखातं मलाच द्या. गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी आहेत. तुम्ही फक्त पक्ष फोडत राहा. ओबीसी विरुद्ध मराठा असे वाद लावत जा”, अशीही टीका त्यांनी केली.