लोणावळा : माणूसकीला व खाकी वर्दीला काळीमा फासणारी घटना बुधवारी नाताळाच्या दिवशी मावळ तालुक्यातील लोहगड विसापूर किल्ला परिसरामध्ये घडली आहे. कामावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रकार केला आहे. याप्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो, ॲट्रासिटी व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्याचे निलंबनही करण्यात आले आहे.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. याकरिता पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून पोलीस ठाण्यांना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. पुणे मुख्यालयातून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बंदोबस्त कामासाठी आलेला पोलीस कर्मचारी सचिन वसंत सस्ते (वय ४३, सध्या रा. महंमदवाडी, हडपसर, पुणे. मूळ रा. जेजुरी, पुरंदर) हा बंदोबस्त कामी लोहगड विसापूर किल्ला परिसरात असताना त्या ठिकाणी खेळत असलेल्या एका पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीला त्याने चॉकलेटचे आमिष दाखवत आडबाजूला घेऊन जात तिच्यासोबत दारूच्या नशेमध्ये अश्लील चाळे केले असल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मायने हे करत आहेत.
हेही वाचा – पुणे : ओढे, नाल्यांवरील पुलांचेही होणार स्ट्रक्चरल ऑडिट कोणी घेतला निर्णय?
हेही वाचा – पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
रक्षकच बनला भक्षक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या लोहगड व विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर असलेल्या एका खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याने पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघड झाल्याने सर्वांनी संताप व्यक्त केला आहे. ज्याला आपण रक्षक समजतो तोच भक्षक ठरल्याने न्याय मागायचा कोणाकडे असा संताप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. सदर पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी आला म्हणून त्याला माणुसकीच्या नात्याने जेवायला दिले. पोलीस विभागाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा. विकृत मानसिकता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.