पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे सौदागर येथील उच्चभ्रू सोसायटीत एका संगणक अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू झाला. शिवकांत मिरकले अस मृत्यू झालेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. ते आणि त्यांची पत्नी अनुपमा हिंजवडीमधील वेगवेगळ्या नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होते. घरी परतत असताना त्यांचा चारचाकीला कट मारण्यावरून दोन तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर गुरुवारी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी उच्चशिक्षण घेत असलेल्या दोघांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकांत मिरकले (३८) हे गेल्या काही वर्षापासून पिंपरी-चिंचवड मध्ये वास्तव्यास आहेत. शिवकांत आणि पत्नी अनुपमा हे संगणक अभियंता असून हिंजवडी मध्ये काम करतात. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शिवकांत हे कार चालवत होते. राहत्या सोसायटीच्या काही अंतरावर त्यांनी एका चारचाकीला कट मारली. यामुळे चारचाकी चालकांनी त्याचा पाठलाग करत राहत्या सोसायटीच्या गेटच्या आत त्यांना अडवले. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर शिवकांत यांनी गाडीच्या डिकीमधून दांडके काढत चारचाकीतील दोन तरुणांना दम दिला आणि ते सोसायटीच्या पार्किंगकडे निघून गेले.

या वेळेत तरुणांनीदेखील हॉकी स्टिक काढत त्याच्या माग घेतला. पण चारचाकी घेऊन शिवकांत पुढे निघून गेल्याने ते त्यांना सापडले नसल्याचे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले आहे. पार्किंग च्या दिशेने जात दोन तरुणांनी शिवकांत यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते भेटले नाहीत. त्यानंतर तरुणांनी सुरक्षारक्षकाकडे शिवकांत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सापडले नाहीत. अखेर तरुणांनी सोसायटीच्या व्यवस्थापकाला फोन करून घडलेली घटना सांगितली आणि सोसायटीमधून ते निघून गेले.

त्यादरम्यान शिवकांत इमारतीच्या महिला मजल्यावर गेले. ते तिथे सुखरूप पोहचल्याचे सिसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. मात्र पुढे काही पाऊल चालल्यानंतर ते खाली पडल्याचा आणि धापा टाकल्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला आला. त्यावेळी शेजारी बाहेर आले आणि त्यांनी शिवकांत यांना जिन्याच्या मोकळ्या जागेत बसवले. त्यावेळी त्यांचा भुवईच्यावर आणि हनुवटीला जखम झाली होती. काही मिनिटे त्या ठिकाणी बसल्यानंतर शिवकांत यांना त्यांच्या घरात घेऊन जाण्यात आले. तेव्हा त्यांच्या पत्नीशी त्यांचं बोलणं झालं आणि काही मिनिटांत माझी तब्बेत बरी नसल्याचे सांगत शिवकांत यांनी प्राण सोडले.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सांगवी पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता वर्तविली असून त्याचा अधिक तपास सांगवी पोलिसांनी करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious death observed of computer engineer in pune
Show comments