पुणे : औद्योगिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत पुणेस्थित आलोक काळे या युवा उद्योजकाने औद्योगिक कचऱ्यापासून नवनिर्मिती केली आहे. औद्योगिक कचऱ्यातून त्याने पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा व्यवसाय फुलविला असून, कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या गंभीर प्रश्नावरही उपाय शोधला आहे.
जे. पी. श्रॉफ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘सस्टेनेबिलिटी क्रुसेडर’ पुरस्कार यावर्षी पुण्यातील मॅग्नस व्हेंचर्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक आलोक काळे यांना जाहीर झाला आहे. ‘सस्टेनेबिलिटी स्टार्ट-अप’ या विभागामध्ये काळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, येत्या २० डिसेंबरला इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते तो प्रदान केला जाणार आहे. या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना आलोक काळे म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षणानंतर मी परदेशात कामासाठी गेलो. तेथील औद्योगिक कचऱ्याची समस्या मला जाणवली. भारतात परतल्यानंतर २०१० मध्ये मी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करू लागलो. तिथेही औद्योगिक कचऱ्याची समस्या आणि त्यांचा पुनर्वापर हा विचार माझ्या डोक्यात कायम होता. त्यामुळे मी वडिलांसोबत काम करीत असताना याबाबतचे संशोधन कायम ठेवले.
हेही वाचा >>>व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
औद्योगिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्याच्या संशोधन आणि विकासाचा टप्प्यावर काही वर्षे मी काम सुरू ठेवले. त्यानंतर वडिलांना मी स्वतंत्रपणे हा व्यवसाय करण्याचा मानस सांगितला आणि त्यांनीही याला होकार दर्शविला. मी २०१९ मध्ये पहिल्यांदा व्यावसायिक पातळीवर सिलिका सँडपासून बांधकामाच्या विटा बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला पुण्यातील मोठ्या विकसक कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी बांधकामाच्या इतर उत्पादनांवर संशोधन करून ती बाजारात आणली. टाईल्स, स्टोन अडेझिव्ह, रेडी मिक्स प्लास्टर यांसारख्या सर्वांत कमी कार्बन फूटप्रिंट असलेल्या पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती केली. त्यांनाही बांधकाम क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातून औद्योगिक कचऱ्याची समस्या कमी होऊन नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापरही कमी होत आहे. यातून दोन्ही बाजूने पर्यावरण रक्षणाचे काम आपण करीत आहोत, असे काळे यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
नारायण मूर्ती यांच्याकडून माझ्यासारख्या स्वयंउद्योजकाला पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. नवीन क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्या तरुणांना यामुळे पाठबळ मिळेल. यातून आणखी तरुण पर्यावरणपूरक व्यवसाय संधीचा शोध घेतील.- आलोक काळे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, मॅग्नस व्हेंचर्स