विद्याधर कुलकर्णी

पाश्चात्य डॅनियलच्या जीवनात अभिजात संगीताचा ‘सुयोग’

स्वयंपाक करून इतरांना खाऊ घालणाऱ्या हाताला संवादिनीवादनाची गोडी लागली आहे. अमेरिकेत जन्मलेल्या डॅनियलच्या जीवनात अभिजात संगीत शिक्षणाचा ‘सुयोग’ जुळून आला आहे. व्यवसायाने शेफ असलेल्या डॅनियलच्या हाताची बोटे संवादिनीवर संचारी झाली आहेत. शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरेचे अप्रूप असलेला डॅनियल संवादिनीवादन शिकत आहे. ‘खाणं’ आणि ‘गाणं’ याचा मिलाफ असा जुळून आला आहे.

वय अवघ्या तिशीचे. मूळचा अमेरिकेतील अ‍ॅटलांटा येथील. लोकांना चवीचे खाद्यपदार्थ बनवून देण्याचे म्हणजेच हॉटेलमध्ये शेफचे काम करणारा डॅनियल. भारतीय संस्कृती, शास्त्रीय संगीत आणि आध्यात्मिक शांती या गोष्टींच्या ओढीने तो भारतामध्ये आला. प्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांच्याकडे डॅनियल गेल्या चार महिन्यांपासून गुरुकुल पद्धतीनुसार संवादिनी आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. नगर येथे वास्तव्यास असलेला डॅनियल आठवडय़ातून एकदा कुंडलकर यांच्याकडे अडीच तास संगीत अध्ययनासाठी येतो.

अ‍ॅटलांटा येथे एका मैफलीसाठी गेलो असताना माझ्या परिचित असलेल्या उषा बालकृष्णन यांच्या घरी जाण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडे डॅनियल याच्याशी माझी पहिली भेट झाली. त्यांच्याकडे तो गाणं शिकायला येत असे, पण त्याचा कल गाण्यापेक्षाही वादनाकडे अधिक आहे. त्यामुळे मी त्याला संवादिनीवादन शिकवावे, अशी इच्छा उषाताई यांनीच प्रदर्शित केली. डॅनियल हा पूर्ण वेगळ्या संस्कृतीतला युवक आहे अशा भ्रमात मी असताना तो उत्तम उर्दू आणि हिंदूी भाषेत बोलायला लागला, असे सुयोग कुंडलकर यांनी सांगितले. तो दहा वर्षांपूर्वी एकदा भारतामध्ये आला होता. तो बनारस, बिहार येथे गेला असून त्याला बनारस घराण्याची गायकी, ब्रज भाषेतील बंदिशी आणि पारंपरिक लोकसंगीताचे आकर्षण असल्याचे जाणवले. भारतीय संस्कृती, मानसिक शांतीसाठी योगक्रिया साधना आणि शास्त्रीय संगीतातील गुरू-शिष्य परंपरा याविषयी त्याला चांगली जाण आहे, असेही कुंडलकर यांनी सांगितले.

डॅनियल हा अवतार मेहेरबाबा यांना मानतो. नगर येथील मेहेरबाबा केंद्रामध्ये सध्या तो वास्तव्यास आहे. मेहेरबाबा यांच्या रचनांचा तो इंग्रजी भावानुवाद करीत आहे. त्यांच्या रचना तो सदैव गुणगुणत असतो. त्याला मराठी संस्कृती आणि खाद्यपदार्थाविषयी आस्था आहे. मिसळ आणि वडापाव तो आनंदाने खातो आणि ‘चहा कुठे घ्यायचा’ असे विचारले तर, ‘अमृततुल्य’ असे त्याचे उत्तर असते, असे सुयोग कुंडलकर यांनी सांगितले.

भारतीय संगीताची मला आवड आहे. हे संगीत शिकण्यासाठी मी चांगल्या गुरूच्या शोधात होतो. सुयोग कुंडलकर यांना भेटल्यानंतर माझा हा शोध संपला असून मी आता संगीताच्या आनंदामध्ये रममाण झालो असल्याची भावना डॅनियल याने व्यक्त केली.

‘स्वरयोगिनी’ची शाबासकी

स्वरावर्तन फाउंडेशनतर्फे मासिक संगीत सभेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे गायन होत असते. राग-रूपाचे सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या बंदिशींचे गायन असे या मैफलीचे स्वरूप असते. मार्च महिन्यातील सभेत डॅनियल याने भैरवीतील बंदिश गायली. त्याला मी किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांची एक बंदिश शिकविली होती. ती त्याला फारच आवडली. या बंदिशीचे गायन करून त्याने ‘स्वरयोगिनी’ची शाबासकी मिळविली होती, असे सुयोग कुंडलकर यांनी सांगितले.