संगीताच्या मूळ तत्त्वांचा ठाव घेऊन ती कंठस्थ करणाऱ्या बारा ‘स्वरदर्शी’ कलाकारांची प्रकाशचित्रे असलेली दिनदर्शिका प्रसिद्ध औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी निर्मिली आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात या दिनदर्शिकेचे प्रकाशन होणार असून महोत्सवातील स्टॉलवर ही दिनदर्शिका सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे.
या दिनदर्शिकेची माहिती देताना सतीश पाकणीकर म्हणाले, भारतीय शास्त्रीय संगीताला फार मोठी परंपरा लाभलेली असली तरी हे अभिजात संगीत काळाबरोबर सतत बदलत आले आहे. वसाहतवादाच्या प्रचंड आक्रमणात अनेक जुन्या गोष्टी नामशेष झाल्या. मात्र, भारतीय संगीताचे तसे झाले नाही. हे अभिजात संगीत कोणत्याही महान कलाकाराबरोबर निवर्तले नाही. या संगीताने मनाचा ठाव घेतला. ज्यांनी या संगीताच्या मूळ तत्त्वांचा ठाव घेऊन ते कंठस्थ केले अशा बारा कलाकारांची या दिनदर्शिकेच्या मंचावर दर्शनभेट घडणार आहे. यामध्ये पं. अजय पोहनकर, पद्मा तळवलकर, वीणा सहस्रबुद्धे, पं. राजन-साजन मिश्रा, श्रुती सडोलीकर-काटकर, पं. अजय चक्रवर्ती, पं. एम. व्यंकटेशकुमार, पं. उल्हास कशाळकर, शुभा मुद्गल, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर आणि उस्ताद रशीद खाँ हे कलाकार यंदाच्या ‘स्वरदर्शी’ दिनदर्शिकेच्या पानांमधून रसिकांना भेटतील.

Story img Loader