पुणे : ‘माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपापसातील मतभेद विसरून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर भर देत कारखानदारांना एकत्र करत राज्यभर ‘एआय’ चा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ही नक्कीच चांगली बाब आहे. मात्र, कारखानदारांकडून काटामारी आणि साखरेच्या उताऱ्यात होणारी चोरी (रिकव्हरी) करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लुटीबाबत पवार काका पुतणे मूग गिळून गप्प का आहेत,’ अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी येथे केली.

‘एआय’चे तंत्रत्रान कारखादारांच्या सोईने नव्हे तर, शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरले जावे आणि त्याचा वापर ऊसाची काटमारी आणि साखरेच्या उताऱ्यात होणारी चोरी रोखण्यासाठी करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालिमाट यांची मंगळवारी भेट घेत विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांवर टीका केली.

‘राज्य सरकारकडून एआय तंत्रत्रानासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाला कोणताही विरोध नाही. सर्वोच्च दर्जाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. मात्र, कारखानदारांच्या सोयीऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तंत्रत्रानाचा वापर व्हावा. साखर कारखाने काटा मारतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

काटामारीतून जमा झालेल्या काळ्या पैशाचा राजकारणात वापर होतो. शेतकऱ्यांची लूट होणाऱ्या ठिकाणी एआय तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही, याची विचारणा साखर आयुक्तांकडे करण्यात आली आहे. राज्य सरकार आणि कारखानदारांचे शेतकऱ्यांबाबतचे प्रेम बेगडी आहे. शेतकऱ्यांचे हित जपायचे होते तर, उच्च न्यायालयाने एक रकमी ‘एफआरपी’चा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकताच नव्हती,’असे शेट्टी यांनी सांगितले.

‘त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ दे’

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासंदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, त्यांचे नाते अधिक घट्ट होऊ द्या. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले असते तर, जास्त आनंद झाला असता. परस्पर विरोधी मताची माणसेही एकत्र भेटतात. ही आपली संस्कृती आहे.