बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी पिंपरी महापालिकेने दहा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आणि दरवर्षी नियमितपणे वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या पवनाथडी जत्रेने ही परंपरा यंदाही कायम राखली आहे. पवनाथडी रद्द करण्याचे पत्र कारभारी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले. पवनाथडीसाठी तब्बल ७० ते ८० लाख रुपये खर्च होतो, असे कारण त्यासाठी दिले. ४५ लाखात पवनाथडीचा खर्च बसवू, असे सांगत भाजप पदाधिकाऱ्यांनी पवनाथडीचा आग्रह धरल्याने आमदारांचा विरोध मावळला, मात्र या काटकसरीच्या मुद्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली. ५०० कोटी रुपयांच्या रस्तेविकासाच्या कामात भाजप नेत्यांनी संगनमताने कोटय़वधींची दलाली लाटली, तो उद्योग लपवण्यासाठी काटकसर पुराण सुरू करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर, जनतेच्या पैशाची कायम उधळपट्टी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या हातातून सत्ता गेल्याने खोटे आरोप करून ते कांगावा करत असल्याचा पलटवार भाजपनेही केला. वास्तविक पाहता, भाजप आणि राष्ट्रवादीत कसलाही फरक करता येणार नाही. जे उद्योग राष्ट्रवादीने केले, तेच भाजपकडून सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या काळात पिंपरी महापालिकेची खाऊगल्ली झाली होती. पालिकेतील भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे बाहेर काढून भाजपने राष्ट्रवादीला पुरते बदनाम केले. मात्र तेच घोटाळेबाज अधिकारी आणि ठेकेदार हाताशी धरून भाजपची खाबूगिरी सुरू आहे. महापालिकेत वेगवेगळय़ा माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. कालही तेच होते आणि आजही तेच चित्र आहे. राष्ट्रवादीच्या काळात किमान अजित पवारांचे काहीतरी नियंत्रण होते, मात्र भाजपमध्ये सगळेच नेते असल्याने कोणीच कोणाचे ऐकायच्या मन:स्थितीत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा