श्रीमंत माधवराव पेशवे यांचा पराक्रम आणि त्यांचे व्यक्तित्व उलगडणाऱ्या ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीचे गारुड ५५ वर्षांनंतरही कायम आहे. आतापर्यंत ‘स्वामी’ कादंबरीच्या ३५ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून या निकषाच्या आधारे किमान चार लाख प्रतींची विक्री ध्यानात घेता ‘स्वामी’ ही मराठीतील सर्वाधिक खपाची साहित्यकृती ठरली आहे.
रणजित देसाई यांनी १९६१ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीच्या लेखनाला प्रारंभ केला. त्यासाठी ते बेळगावजवळील मरणाहोळ येथील जंगलात मुक्कामाला गेले होते. कादंबरीचा अखेरचा भाग म्हणजे शेवटची ३० पाने त्यांनी गोकाकजवळील घटप्रभा येथील वास्तव्यात लिहून पूर्ण केली होती. देशमुख आणि कंपनी या प्रकाशन संस्थेने ऑगस्ट १९६२ मध्ये ‘स्वामी’ कादंबरीचे प्रकाशन केले होते. या कादंबरीचे हस्तलिखित राजा दिनकर केळकर संग्रहालय येथे देण्यात आले होते, अशी माहिती देसाई यांचे स्नेही आणि त्यांना लेखन साहाय्य करणारे पांडुरंग कुंभार यांनी दिली. देशमुख आणि कंपनीने ‘स्वामी’च्या पहिल्या नऊ आवृत्त्या प्रकाशित केल्या होत्या.
मेहता पब्लिशिंग हाउसकडे १९८१ पासून ‘स्वामी’ कादंबरीच्या प्रकाशनाचे हक्क आले आणि दहावी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. प्रत्येक आवृत्ती ही किमान पाच ते सात हजार प्रतींची होती.
रवींद्र मंकणी आणि मृणाल कुलकर्णी यांची भूमिका असलेल्या ‘स्वामी’ या दूरदर्शन मालिकेच्या काळात ‘स्वामी’च्या ४० हजार प्रतींची आवृत्ती काढण्यात आली होती, अशी माहिती मेहता पब्लिशिंग हाउसचे सुनील मेहता यांनी दिली. ‘स्वामी’चे गुजराथी, हिंदूी, उडिया आणि कन्नड या भाषांमध्ये अनुवाद झाले असून ‘अॅमॅझॉन’वर ‘स्वामी’चे ई-बुक व्हर्जन देखील उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
अष्टविनायकातील थेऊर येथील चिंतामणी गणेशाच्या चरणी ‘स्वामी’ कादंबरीची नवी आवृत्ती प्रकाशित केल्यानंतर त्याची पहिली प्रत अर्पण केली जाते. त्याचप्रमाणे थेऊर देवस्थानच्या ग्रंथालयामध्येही ‘स्वामी’ची प्रत दिली जाते, असे सुनील मेहता यांनी सांगितले.