कोथरूड येथील स्वप्नशिल्प सोसायटीतील एका निवृत्त डॉक्टराने आजारपणाला कंटाळून आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यात ‘पूर्ण विचार करून आत्महत्या करीत असून आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये,’ असे लिहले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. अरुण माधव भावे (वय ७७, रा. बिल्डिंग क्रमांक जे, स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरूड) असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. भावे हे मध्य रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात डॉक्टर होते. या सोसायटीतील ‘जे’ इमारतीतील तीस क्रमांकाच्या सदनिकेत पत्नीसह राहत होते. त्यांचा मुलगा अभियंता असून तो याच सोसायटीतील दुसऱ्या इमारतीमध्ये राहतो. डॉ. भावे हे दररोज सकाळी फिरण्यासाठी जात होते. पण, आज सकाळी ते गेले नाहीत. सकाळी साडेसहाच्या सुमारास एक दूधवाला आल्यानंतर त्याने सदनिकेच्या समोर असलेल्या जागेत स्टुल पाहिला आणि घरात फक्त भावे यांच्या पत्नीच होत्या. त्यांनी स्टुल पासून खाली पाहिल्यावर त्यांना डॉ. भावे हे इमारतीच्या डक्टमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ इमारतीमधील इतर नागरिकांना माहिती दिली. पोलिसांना कळविल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराची चौकशी केल्यानंतर त्यांना डॉ. भावे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. डॉ. भावे हे काही वर्षांपासून मधुमेहासारख्या आजाराने त्रस्त होते. त्याला कंटाळूनच त्यांनी आज आत्महत्या केली. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे हे अधिक तपास करीत आहेत.
‘इच्छा मरणासाठी कायदा करा’
गेल्या काही वर्षांपासून डॉ. अरुण भावे हे मधुमेहामुळे आजारी होते. त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी उपचार करण्यात आले होते. मात्र, आजार बरा होत नसल्यामुळे ते कंटाळले होते. आजारपणालाच कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये त्यांनी ‘भारतात इच्छामरण लागू करा’ असे म्हटले आहे. त्याच बरोबर पूर्ण विचार करून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरू नये असेही लिहिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा