पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर आख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. पण आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून या व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. आता त्यानं आत्महत्या केल्यानंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली आहेत. पुण्यातील काही मुलांशी यासंदर्भात संवाद साधला असता, “राजकीय नेत्यांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचं काही देणंघेणं नाही. या नेत्यांना केवळ स्वतःची मुलं सेट झाली पाहिजेत. एवढंच त्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षाचा मुलगा मंत्री होतो. पण आमच्या नियुक्तयांचं काय?”, असा परखड पण उद्विग्न सवाल या मुलांकडून विचारला जात आहे.
…आम्ही आता गावी जाणंच बंद केलंय!
अक्षय रामहरी शेळके, महेश घरबुडे, महेश पांढरे, अविनाश शेमबाटवाड, सचिन सावदेकर, रामेश्वर आर या सर्वच परीक्षार्थींनी या मुद्द्यावरून सरकारला कठोर प्रश्न केले आहेत. “राज्यभरात स्पर्धा परीक्षा देणार्या मुलांची संख्या तीन लाखांहून अधिक आहे. ही परीक्षा देताना, लाखो रुपये खर्च होतात. ही स्पर्धा देणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातीलच आहे. घरून सर्व पैसे पुरवले जातात. एवढं करून देखील परीक्षेत पास झालो नाही. तर घरचे आणि गावातील लोक काय म्हणतील? असे विचार मनात येतात. यामुळे आम्ही गावाला देखील जाणं बंद केलंय, असं या परीक्षार्थींच म्हणणं आहे.
शेतात राबणाऱ्या बापाला काय उत्तर द्यायचं?
मागील काही वर्षात MPSC ची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासन आणि आयोग कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. परीक्षेच्या तारखे पासून ते नियुक्त्या जाहीर करेपर्यंत आजवर गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. याचा फटका सर्व कुटुंबातील तरुणांना बसला आहे. परीक्षा देत-देत वय निघून गेलंय. कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही. एवढं शिक्षण घेऊन आमच्या वाट्याला अपयश आणि नैराश्य आलं आहे. आम्ही कसं जगायचं आणि शेतात राबणाऱ्या बापाला काय उत्तर द्यायचं? असा सवाल हे परीक्षार्थी आता विचारू लागले आहेत.
राज्यकर्त्यांमुळे आमच्यावर ही वेळ आली
शासन आणि राजकीय नेत्यांच्या इच्छा शक्तीच्या अभावामुळे स्वप्निलने आत्महत्येचं पाऊल उचललं. याला जबाबदार ही व्यवस्था असून असे स्वप्निल अभ्यासिकेत अनेक वेळा पाहायला मिळतात. हे झालं आमच्या मित्राचं, पण ज्या राज्यकर्त्यांमुळे आमच्यावर ही वेळ आली. त्यांना आमचं देणंघेणं नसून त्यांना त्यांच्या मुलांना आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून सेट करायचं आहे. आपल्या राज्याचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री साहेब तुमचा मुलगा २८ वर्षाचा आहे. तो आमदार होतो, मंत्री होतो. पण आमचं काय? मुख्यमंत्री साहेब आमच्या परीक्षा ते नियुक्त्यांबाबत निर्णय घ्या. अन्यथा शेतकरी आत्महत्यांनंतर स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांचा विस्फोट होईल, एवढंच सरकारने लक्षात ठेवावं, असा इशारा देखील या परीक्षार्थींनी दिला आहे.
MPSC Exams : युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या – रोहित पवारांची ठाकरे सरकारला विनंती
नेत्यांना १२ आमदारांचं पडलंय, पण…
या राजकीय नेत्यांना १२ आमदारांचं आणि सत्ता वाचविण्याचं पडलं आहे. पण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं काही नाही. त्यामुळे उद्या होणार्या अधिवेशनात विधानसभा आणि परिषदेतील आमदारांनी आमच्या समस्यांवर एकदा तरी प्रश्न विचारावा, अशी मागणी या परीक्षार्थींनी केली आहे. त्यामुळे आत राज्य सरकारकडून यावर नेमकी कोणती भूमिका घेतली जाते, याकडे या हजारो परीक्षार्थींचं लक्ष लागलं आहे.
स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र
मुख्यमंत्री साहेब, तुम्ही किमान फेसबुक लाईव्हमध्ये…
मुख्यमंत्री साहेब, आम्ही करोनासोबत जगण्यास तयार आहोत. तुम्ही परीक्षा घेतच नाही मग कसं जगायचं हे तरी सांगा. तुमचे कार्यक्रम, सभा होतात. पण आमच्या परीक्षा का होत नाहीत? नियुक्त्या का होत नाहीत? तुम्ही किमान फेसबुक लाईव्हमध्ये तेवढं तरी सांगा, अशी मागणी या परीक्षार्थींनी केली आहे.