स्वारगेट येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी सकाळी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर लगेचच स्वारगेटकडून लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुलाचा वापर सुरू केला. ‘देशभक्त कै. केशवराव जेधे उड्डाणपूल’ असे नाव या पुलाला देण्यात आले आहे.
स्वारगेट येथील जेधे चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दोन चौकांना जोडणारे दोन पूल बांधण्यात येत आहेत. या पुलाची स्वारगेट एसटी स्थानक ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृह ही एक बाजू पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने शनिवारी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम केल्यानंतर पुलाचा वापर सुरू झाला. या पुलाची लांबी पाचशे साठ मीटर इतकी असून तो दुपदरी आहे.
महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर आबा बागूल, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, माजी सभागृहनेता सुभाष जगताप, नगरसेविका स्मिता वस्ते, मानसी देशपांडे, मनीषा चोरबेले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
सोलापूर रस्त्यावरील आयकर भवन ते लक्ष्मीनारायण चित्रपटगृह दरम्यान एक पूल तयार होणार असून दुसरा पूल लक्ष्मीनारायण चित्रपटगृह ते नेहरू स्टेडियम या दरम्यान तयार होणार आहे. त्यामुळे सोलापूर रस्त्यावरून ज्यांना कात्रजकडे जायचे आहे तसेच कात्रजकडून आलेल्या ज्या वाहनचालकांना नेहरू स्टेडियमकडे जायचे आहे, त्यांना आता स्वारगेट चौकात यावे लागणार नाही. या इंग्रजी वाय आकाराच्या दोन पुलांपैकी एका पुलाचे काम पूर्ण झाले आहे.