भारतीय अभिजात संगीतातील पुरातन घराणे असा लौकिक असलेल्या ‘आग्रा’ घराण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे ‘स्वरसाधना’ गुरुकुल पुण्यामध्ये साकारले आहे. आग्रा घराण्याच्या गायकीविषयीचे गैरसमज दूर करण्याबरोबरच युवा कलाकारांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणारे हे गुरुकुल ज्येष्ठ गायक पं. बबनराव हळदणकर यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. याच धर्तीवर मुंबई, बडोदे, दिल्ली आणि आग्रा येथेही गुरुकुल सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े आहेत. मात्र, ही गायकी समृद्ध आणि अष्टपैलू आहे याची जाणीव रसिकांना नाही. घराण्याच्या या गुणांचे दर्शन आजच्या पिढीला व्हावे आणि आग्रा घराण्याच्या गायकीची खरी ओळख पटावी, या उद्देशाने सर्वागपूर्ण शिक्षण देणारे गुरुकुल सुरू करण्यात आले असल्याची माहिती पं. बबनराव हळदणकर यांनी दिली. घरंदाज गायकी शिकण्यासाठी शिबिरे आणि कार्यशाळा, सप्रयोग व्याख्याने, सांगीतिक विचारांचे आदान-प्रदान करणारे आणि युवा कलाकारांना स्वरमंच उपलब्ध करून देणारे व्यासपीठ आणि जुन्या पिढीतील बुजुर्ग कलाकारांच्या मैफलींचे श्रवण, असे या गुरुकुलाचे स्वरूप असेल, असेही त्यांनी सांगितले.
पं. बबनराव हळदणकर म्हणाले, ‘‘आग्रा घराण्याच्या गायकीमध्ये सुरेलपणा तर आहेच; पण, त्याचबरोबरीने तालावर प्रभुत्वदेखील आहे. त्यामुळेच उत्तम बंदिशींची निर्मिती झाली आहे. रागाची शुद्धता काटेकोरपणे पाळली जाते. सुरांचे लगाव हे रागवाचक असतात. मोजक्या स्वरांमध्ये आशय मांडण्याचे सामथ्र्य असलेले हे घराणे आहे. रागाचे भाव जाणून घेत त्याप्रमाणे राग सादर केला जातो. त्यासाठी संगीतातील १८ अंगांचा वापर केला जातो. त्यामुळे एकाच मैफलीमध्ये निरनिराळ्या भावांचे राग गायन करूनसुद्धा वैविध्य निर्माण करू शकतो. त्यासाठी कलाकाराला ठुमरीचा आश्रय घ्यावा लागत नाही. मात्र, फक्त लयीकडे आणि सुरांकडे लक्ष देणारे असा आग्रा घराण्याच्या गायकीविषयीचा गैरसमज झाला आहे. याउलट प्रत्येक रागामध्ये कालवाचक स्वरांचा श्रुतीयुक्त लगाव हे घराण्याचे वैशिष्टय़ आहे. स्वरसाधना गुरुकुलामध्ये युवा पिढीली मी स्वत शिकविणार आहेच; पण त्याचबरोबरीने कविता खरवंडीकर, पूर्णिमा धुमाळे, चंद्रशेखर महाजन हे माझे शिष्य गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणार आहेत.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा