पुण्याच्या कारभाऱ्यांना पुण्याच्या संस्कृतीबद्दल काहीही माहिती नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. ज्येष्ठ कलावंत डॉ. श्रीमती प्रभा अत्रे यांना जाहीर झालेल्या ‘स्वरभास्कर’ पुरस्कारावरून ते पुन्हा एकदा जाहीर झाले, पण त्यामुळे पुण्याच्या संस्कृतीची लाज वेशीवर टांगली गेली. याबद्दल कारभाऱ्यांना काही चाड असेल, असे वाटत नाही. ज्या महाराष्ट्रात पुणे हे संगीतासाठी सातत्याने अग्रेसर राहिले, त्या पुण्यातच असे घडावे, हे लाजिरवाणे आहे.
श्रीमती प्रभा अत्रे यांचे वडील बाबासाहेब अत्रे यांनी पुण्याच्या पूर्व भागात सुरू केलेल्या कॅम्प एज्युकेशन सोसायटीमुळे त्या भागातील गरीब मुलांच्या शिक्षणाची मोठी सोय झाली. वडिलांच्या पश्चात प्रभा अत्रे यांनी त्या संस्थेची धुरा सांभाळली आहे आणि शिक्षणाचा व्यवसाय होऊ न देता ती संस्था त्याच हेतूने आजही काम करीत आहे. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे आणि त्याबद्दल भारतातील सगळ्या रसिकांनी त्यांना आजवर अनेकदा मन:पूर्वक दादही दिली आहे. त्यांना पुणे महानगरपालिकेच्या ‘स्वरभास्कर’ पुरस्काराने आणखी काही अधिक मिळण्याची शक्यता नाही. पुरस्कार देणे ही संस्कृती त्या व्यक्तीच्या कार्याबद्दल असलेला आदर जाहीर व्यक्त करण्यासाठी निर्माण झाली. महानगरपालिकेत असे डझनावारी पुरस्कार दिले जातात. ते सगळे केवळ उरकण्यासाठीच दिले जातात. कारण ज्यांच्या नावाने तो दिला जातो, त्याबद्दल कारभाऱ्यांना काही माहीत नसते. ज्यांना दिला जातो, त्यांच्याकडून काही मिळण्याची शक्यता नसते.
नानासाहेब गोरे महापौर असताना श्रीमती लता मंगेशकर यांना नेहरू स्टेडियमवर मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला होता. त्या वेळी नानासाहेबांनी केलेले भाषण हे एखाद्या सुसंस्कृत विद्वानालाही लाजवेल असे होते. त्यांना लता मंगेशकर कोण आहेत, हे माहीत होते, म्हणून हे घडू शकले. आज तशी परिस्थिती नाही. टेंडरने आजच्या काळात सगळ्या महापालिकांमध्ये जो घोळ केला आहे, त्याने सारेच काही नासले आहे. कारभाऱ्यांना त्याबद्दल लाज वाटत नाही, कारण आपण काही चूक करतो आहोत, हेच त्यांना कळत नाही. अंतर्गत राजकारणात जागतिक दर्जाच्या एखाद्या कलावंताचा जाहीर अपमान करण्यात त्यांना धन्यता वाटते, हे आपले दुर्दैव आहे.
काँग्रेसच्या आबा बागूल यांना या पुरस्कारापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंडळींनी केलेली ही राजकीय खेळी समस्त पुणेकरांना मान खाली घालायला लावणारी ठरली आहे. पुण्यात काय पिकते, याची माहिती देण्यासाठी कारभाऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करायला हवेत. संपूर्ण भारतात फक्त पुणे शहरात प्रायोगिक नाटक रसरशीतपणे जिवंत आहे, हे त्यांना सांगायला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्वात जास्त संस्था याच शहरात आहेत, हेही त्यांना समजावून सांगायला पाहिजे. पण महापालिकेतील एकालाही आजवर प्रायोगिक नाटकांसाठी नाटय़गृह बांधायचे सुचले नाही. घोलेरस्त्यावरील जे नाटय़गृह बांधले जात आहे, त्याकडे लक्ष देण्याची कुणाची इच्छा नाही. केवळ नृत्य कलावंतांसाठी स्वतंत्र सभागृह बांधणे सहज शक्य आहे. पण त्याबद्दल कुणाला आच नाही.
बिबवेवाडीतील अण्णा भाऊ साठे स्मारकात नाटक पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना स्वच्छतागृहात पाणी नाही, म्हणून ओरडा करावा लागतो. शहरातील बहुतेक कलादालने अतिशय वाईट अवस्थेत आहेत आणि तेथे दुरुस्ती करण्यासाठी मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते. हे सारे भयावह आणि किळसवाणे आहे. फक्त संगीतासाठी अतिशय उत्तम ध्वनियोजना असणारे मोठे सभागृह ही पुण्याची कित्येक वर्षांची गरज आहे. पालिकेच्या मालकीची नाटय़गृहे आपल्याच बापजाद्यांची असल्याप्रमाणे दिलेल्या तारखा रद्द करून तेथे आपल्या नेत्यांच्या आरत्या ओवाळण्यातच या कारभाऱ्यांना धन्यता वाटते. हे बदलायचे, तर कारभारीच बदलायला हवेत. पण त्यासाठी कलेच्या प्रांतात पुण्याचे जे नाव आहे, त्यास कारणीभूत असलेल्या सर्वानी एकत्र यायला हवे.
कारभाऱ्यांकडून डॉ. प्रभा अत्रे यांची जाहीर माफी मागण्याचे सौजन्य दाखवले जाणे ही तर फार पुढची गोष्ट झाली.
mukund.sangoram@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा