नवे शब्द आणि नवे सूर यांनी सजलेल्या गीतांची मालिका रसिकांनी शनिवारी अनुभवली. नव्या गीतांचे नवे तराणे श्रवण करताना काव्यगायक गजाननराव वाटवे यांच्या स्मृती जागवित श्रोते ‘स्वरानंदा’त न्हाऊन निघाले.
स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘नवे शब्द, नवे सूर’ या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये नूपुरा निफाडकर आणि अरुणा अनगळ यांच्या संघाने विभागून द्वितीय क्रमांकासह गजाननराव वाटवे करंडक पटकाविला. ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांच्या हस्ते यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रसिद्ध गायक रवींद्र साठे, संजीव अभ्यंकर, गायिका सुवर्णा माटेगावकर, कवी संदीप खरे आणि संगीतकार-गायक डॉ. सलिल कुलकर्णी यांच्यासह वाटवे यांचे चिरंजीव मििलद वाटवे, कन्या मंजिरी चुनेकर आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे या वेळी उपस्थित होते. सवरेत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार अरिवद काडगावकर यांना आणि गीतकाराचा पुरस्कार सुचेता जोशी-अभ्यंकर यांना प्रदान करण्यात आला. शेफाली कुलकर्णी आणि हृषीकेश बडवे यांना सवरेत्कृष्ट गायिका-गायक पुरस्काराने गौरविण्यात आले.
रवींद्र साठे म्हणाले, गजाननराव वाटवे आणि सुधीर फडके हे युगनिर्माते संगीतकार-गायक होते. अतिशय पोटतिडकीने हे दोघेही आपल्या स्वररचना उत्तम होण्यासाठी काम करायचे. या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. सलिल कुलकर्णी म्हणाले, संगीत कळणं आणि चाल सुचणं यामध्ये फरक आहे. ज्यांना काव्य आणि संगीत जाणून घ्यायचे आहे, त्यांनी गीतरामायणाचा अभ्यास करावा.
गाणं भिडलं पाहिजे हाच चांगल्या गीताचा निकष असल्याचे संदीप खरे यांनी सांगितले. शब्द, संगीत, त्यामागचा विचार आणि गायक हे सारे नवे अनुभवता आले, असे सुवर्णा माटेगावकर यांनी सांगितले. यापूर्वीचे वाटवे करंकडाचे मानकरी असलेल्या नकुल जोगदेव, संकेत पुराणिक आणि मधुरा कुलकर्णी यांनी आपल्या रचना सादर केल्या. रवींद्र साठे यांनी ‘मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार’ आणि संजीव अभ्यंकर यांनी ‘तू असतीस तर’ ही वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली गीते सादर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा