पिंपरी पालिकेचा यंदाचा ‘स्वरसागर’ संगीत महोत्सव २० ते २३ जानेवारी दरम्यान चिंचवड व प्राधिकरणात विभागून होणार आहे. नेहमीप्रमाणे ‘स्वरसागर’ची फरफट होणार नाही, तो जानेवारी महिन्यातच होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले. त्याचवेळी महोत्सवाची ठिकाणे याही वर्षी राजकीय प्रभावाखाली निश्चित झाल्याचे दिसून आले.
महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, संयोजक प्रवीण तुपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मंगळवारी (२० जानेवारी) संभाजीनगर येथे महापौरांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर डॉ. सलील कुलकर्णी व आर्या आंबेकर यांचा ‘क्षण अमृताचे’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होईल. बुधवारी (२१ जानेवारी) भूषण तोष्णीवाल यांचे शास्त्रीय गायन, अजहर शेख यांचे बासरी वादन. त्यानंतर, क्लासिकल फ्युजनवर आधारित लुईस बँक्स, रवी चारी यांचा कार्यक्रम होईल. गुरुवारी (२२ जानेवारी) पं. आलोकदास गुप्ता यांचे सतारवादन, त्यानंतर प्रख्यात गायक ऊर्मिला धनगर, आदर्श शिंदे, राहुल सक्सेना यांचा ‘रंगारंग’ हा कार्यक्रम होईल. समारोपाच्या दिवशी शुक्रवारी (२३ जानेवारी) प्राधिकरणात सायंकाळी पं. सुहास व्यास यांचे शास्त्रीय गायन व त्यानंतर वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांचा ‘मन मस्तमौला’ हा कार्यक्रम होईल. ‘स्वरसागर’ यापुढे जानेवारी महिन्यातच होईल, असे तुपेंनी स्पष्ट केले. महोत्सवाचे स्थळ कायम का बदलत राहते, याविषयीचे उत्तर मात्र त्यांनी टाळले. अन्यत्र महोत्सव झाल्यास २५-३० नागरिक येतात, नागरिकांपर्यंत माहिती पोहोचत नाही, असा अनुभव सांगत मंगला कदम यांनी, संभाजीनगर येथे कार्यक्रम घेण्याचे समर्थन केले.