पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) आयुर्मान संपलेल्या आणि नादुरूस्त अशा ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस मोडीत काढण्याचा निर्णय पुणे ‘एसटी’ विभागाने घेतला आहे. शुक्रवारी (२१ मार्च) रोजी या बसचा लिलाव करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (एमएसटीसी) मधील एजन्सीमार्फत या नादुरूस्त बससाठी बोली लावण्यात येणार आहे. नादुरूस्त बसच्या माध्यमातून अडीच ते तीन कोटी रुपये प्राप्त होण्याचा अंदाज ‘एसटी’ महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्काराच्या घटनेनंतर सुरक्षात्मक यंत्रणेचा अभाव समोर आला. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व बस स्थानकातील आयुर्मान संपलेल्या आणि नादुरूस्त बस १५ एप्रिलपर्यंत मोडीत काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पुणे विभागीय कार्यालयाच्या परिसरात ‘एसटी’ महामंडळाच्या ७२ ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बस गेल्या वर्षभरापासून अडगळीत पडून आहेत. याबसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून बसमधील साहित्याची चोरीसारख्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, नादुरूस्त बसचा गैरवापर होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. ‘एसटी’ महामंडळाच्या ताफ्यात नव्याने बस येत असून आत्तापर्यंत ३० पर्यावरणपूरक ‘शिवाई’ बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने २१ मार्चला आयुर्मान संपलेल्या ७२ बस लिलाव प्रक्रियेद्वारे मोडीत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘एसटी’ महामंडळाकडून देण्यात आली.
चार्जिंग क्षमता वाढवणार
शहरातील स्वारगेट बस स्थानकाच्या काही अंतरावर दूर असलेल्या शंकरशेठ रस्त्यावर एसटी’ महामंडळाचे पुणे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयीन परिसरात ‘इलेक्ट्रीक बस चार्जिंग केंद्र आहेत, तर मागील बाजूस आयुर्मान संपलेल्या, नादुरूस्त अशा ७२ शिवशाही, शिवनेरी बस भंगारात पडून आहेत. या बसमुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली जात असून दैनंदीन बस उभ्या करण्यास तसेच चार्जिंग स्थानकाची मर्यादा वाढविण्यास अडचण होते. या बस तातडीने मोडीत काढून चार्जिग क्षमता वाढविण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय आहे.
असा होतो लिलाव
केंद्र सरकारच्या धोरणानुसार मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (एमएसटीसी) हे अधिकृत संकेतस्थळ करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर जाऊन बसची माहिती आणि संख्येची माहिती स्पष्ट करून निविदा भरण्यात येते. त्यानंतर शासनाने निवडलेल्याच अधिकृत एजन्सी किंवा खरेदीदारांना लिलावामध्ये समाविष्ट करून घेतले जाते. लिलाव करताना या बसमधील सुट्टे भाग म्हणजे आसन, लोखंड, इंजिन, ऑईल, पत्रा, चाक, इलेक्ट्रीक साहित्य आदींची बोली लावली जाते, किंवा आहे त्या अवस्थेतील बससाठी बोली लालवी जाते. त्यानुसार सर्वाधिक बोली लावणाऱ्या खरेदीदाराला बस दिली जाते. ठराविक मुदतीनुसार संबंधित बस घेऊन जात त्या मोडीत काढल्या जातात.
‘एसटी’तून साडेआठ कोटीं रुपये प्राप्त
आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढण्याची नियमीत चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या (२०२४) वर्षी एसटी’ महामंडळाच्या १४ आगारातील आयुर्मान संपलेल्या २४० बस मोडीत काढल्या होत्या. त्या बसच्या माध्यमातून एसटी महामंडळाला ८.५ कोटी रुपये प्राप्त झाले होते.
एसटी महामंडलाच्या कार्यालयात आयुर्मान संपलेल्या आणि नादुरूस्त ७२ शिवनेरी आणि शिवशाही बस २१ मार्च रोजी लिलावाद्वारे मोडीत काढण्यात येणार आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. – प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे.