पुणे : स्वारगेट-कात्रज विस्तारित मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे. नगरविकास विभागाला तशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यामुळे विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या प्रस्तावालाही गती मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मेट्रो मार्गिकेचा स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत विस्तार करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. स्वारगेट-कात्रज हा विस्तारित मार्ग भुयारी असणार आहे. महापालिकेने मान्य केलेला हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचा विस्तार कात्रजपर्यंत करण्याची मागणी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यानुसार महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना केली होती. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात साठ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. महामेट्रोकडून उन्नत आणि भुयारी अशा दोन मार्गिकांचा अहवाल आणि आर्थिक आराखडा करण्यात आला होता.
उन्नत मार्गिका करणे अव्यवहार्य असल्याचे पुढे आल्यामुळे कात्रज-स्वारगेट भुयारी मार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले होते. महापालिकेच्या स्थायी समिती आणि मुख्य सभेने प्रस्तावाला मंजुरी दिली होती. स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडूनच केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेचा हिश्श्यापोटीची जमिनीची किंमत आणि पुनर्वसन खर्चासह २३३ कोटी ७५ लाख रुपये एवढा वाटा आहे. केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर तो दिला जाणार आहे. या मार्गिकेसाठी साडेचार हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून राज्य आणि केंद्र शासनाकडून वीस-वीस टक्के निधी दिला जाणार आहे.