स्वारगेट येथील जेधे चौकातील उड्डाणपुलाचे घाईघाईने उद्घाटन करून शिवसेनेने श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असला, तरी हा उड्डाणपूल अद्याप पूर्ण झालेला नाही, असे महापौरांनी आपल्याला सांगितले आहे. महापालिकेने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतरच सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सांगितले. भाजप शिवसेनेला बरोबर घेऊनच काम करणार आहे. मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागू. मात्र, सत्ताधारी म्हणून कसे वागायचे हे शिवसेनेने ठरवावे, असा टोलाही बापट यांनी लगावला.
स्वारगेट उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला कोणाला निमंत्रित करायचे यावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. पालकमंत्री गिरीश बापट हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तर, पालिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावासाठी आग्रही आहे. हा तिढा सुटत नसल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी खुला झालेला नाही. त्याचप्रमाणे या उड्डाणपुलाचे श्रेय भाजपला मिळू नये या उद्देशातून शिवसेनेने शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी गुरुवारी घाईघाईतच या पुलाचे उद्घाटन केले.
यासंदर्भात विचारले असता बापट यांनी या उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, असे महापौर दत्ता धनकवडे यांनी आपल्याला सांगितले असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेमध्ये महापौरांचा शब्द अंतिम असल्याने कोण काय म्हणतो याला तेवढे महत्त्व नाही. महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला मिळाल्याखेरीज या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार नाही. उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले असून त्यांना पत्रही पाठविले आहे. मात्र, जलयुक्त शिवार या कार्यक्रमाला प्राधान्य देण्याचे धोरण असल्याने त्यांना वेळ देता येत नाही. मात्र, सार्वजनिक उपक्रममंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
सरकार न्यायालयात दाद मागेल
नाशिक येथील रेशन धान्य घोटाळा प्रकरणातील दोषी शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने निलंबित केले आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण (मॅट) मध्ये दाद मागितली असून मॅटने या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्यास सांगितले आहे. मॅटच्या या निर्णयाला सरकार उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. या घोटाळ्यामध्ये हे कर्मचारी सहभागी नसतील, तर २८२ क्विंटल धान्य उंदरांनी खाल्ले असेल, अशी उपरोधिक टिपणीही त्यांनी केली.

Story img Loader