शाळकरी मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ४५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी सागर श्रवण पवार (वय २८, रा. राजीव गांधीनगर, आंबीलओढा वसाहत) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सॅलेसबरी पार्क भागात राहणाऱ्या एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारच्या शेजारील सोसायटीत आरोपी पवार एका व्यावसायिकाकडे मोटारचालक म्हणून काम करत होता. त्याने तक्रारदाराच्या १४ वर्षांच्या मुलाशी ओळख वाढविली. मी खूप मोठा गुंड आहे.
हेही वाचा >>> धक्कादायक! आईला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी युपीएससीच्या विद्यार्थ्याकडून वृद्ध दाम्पत्याचा खून
नुकताच कारागृहातून बाहेर आलो आहे. तू घरातून गुपचूप पैसे आणून न दिल्यास तुला पळवून नेऊन जीवे मारु, अशी धमकी पवारने शाळकरी मुलाला दिली होती. पवारच्या धमकीमुळे घाबरलेल्या मुलाने घरातून गुपचुप ४५ हजार रुपये घेतले. त्याने पवारला पैसे दिले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी शाळकरी मुलगा सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळत होता. त्या वेळी पवारने पुन्हा मुलाला गाठले आणि घरातून २५ हजार रुपये आणून दे, असे सांगितले. मुलगा घरात गेला. त्याने घरातील कपाटातून २५ हजारांची रोकड घेतली.
हेही वाचा >>> पुणे : सासूला अद्दल घडविण्यासाठी चोरीचा बनाव, सुनेसह चौघेजण कर्नाटकातून अटकेत
रोकड लपवून निघालेल्या मुलाला त्याच्या आजीने पाहिले. तिने मुलाकडे विचारणा केली. तेव्हा पवारने धमकावून पैसे आणण्यास सांगितल्याचे मुलाने सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आरोपी पवारला जाब विचारला. तेव्हा त्याने वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पवारला ताब्यात घेतले. पवार याच्या विरुद्ध यापूर्वी एक गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.