पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा अहिल्यानगर, सोलापूर, तसेच पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गाडेच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, गेल्या दोन वर्षांतील त्याचा ठावठिकाण्याची माहिती विश्लेषणातून पोलिसांना मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. गाडेचा गुन्हे शाखेकडून लवकरच तपासासाठी ताबा घेण्यात येणार आहे. सध्या गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. स्वारगेट एसटी स्थानक गजबलेले आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात गाडेला मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात स्वारगेट पोलिसंनी अटक केली होती.

गाडेचा अहिल्यानगर, सोलापूर, स्वारगेट, शिवाजीनगर, शिरूर एसटी स्थानकात वावर असल्याचे तांत्रिक तपासातून उघडकीस आले आहे. एसटी स्थानकातील गर्दीत गाडे प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याचे गुन्हे करत असल्याचा संशय पोलिसंनी व्यक्त केला आहे. गाडेने २०१९ मध्ये पुणे ग्रामीण, तसेच अहिल्यानगर परिसरात मोटारीतून ज्येष्ठ महिलांना सोडण्याचे आमिष दाखवून त्यांना निर्जन ठिकाणी लुटण्याचे गुन्हे केले होते.

गाडेचा मोबाइल संच अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्याच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत गाडेचा वावर कोणत्या भागात होता. याची माहिती तांत्रिक तपासातून मिळाली आहे. तपासात गाडेचा सर्वाधिक वावर स्वारगेट एसटी स्थानकात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी गाडेने वाहक असल्याची बतावणी करून प्रवासी तरुणीवर बसमध्ये बलात्कार केला होता. तरुणीला जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. घाबरलेल्या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा खटला द्रुतगती न्यायलायात चालविणे, तसेच विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यासाटी पोलिसांकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

या प्रकरणात पीडित तरुणी, तिची आई, तसेच एसटी बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त