पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी दत्तात्रय गाडे याचा जबाब पोलिसांनी नोंदविला, तसेच गाडेची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारातील शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर मंगळवारी (२५ फेब्रुवारी) बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. आरोपी गाडेने तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली होती. तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेल्या दत्तात्रय गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली गाडे सराइत असून, त्याच्याविरुद्ध पुणे ग्रामीण, शहर, तसेच अहिल्यानगर परिसरात सहा गुन्हे दाखल झाले आहेत. गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.
गाडे याला अटक करण्यात आल्यानंतर त्याला पुण्यात आणण्यात आले. ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी तसेच लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्त आणि केसांचे नमुने डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
याप्रकरणात सखोल तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. गुन्हे शाखा, तसेच स्वारगेट पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
बसची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी
आरोपी गाडेने प्रवासी तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी बसची पाहणी केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.