पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी प्रवासी तरुणीवर दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. गुनाट, ता. शिरूर, जि. पुणे) याने बलात्कार केला होता. सकाळी सहाच्या सुमारास पीडित तरुणी गावी निघाली होती. गाडेने तिच्याकडे वाहक असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर गाडेने शिवशाही बसमध्ये तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्कार करुन पसार झालेल्या गाडेला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून तीन दिवसांनी अटक केली होती. त्यानंतर गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्याच्याविरुद्ध तक्रार असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. गाडेच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तेव्हा त्याचा वावर स्वारगेट, शिरुर, अहिल्यानगर, सोलापूर एसटी स्थानकात वावर असल्याचे आढळून आले होते.

गाडेची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला मंगळवारी (१२ मार्च) न्यायालयात हजर करण्यात आले. गाडे याच्याविरुद्ध यापूर्वी महिलांना लुटण्याचे गुन्हे पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर येथे दाखल आहेत. २०१९ मध्ये गाडे मोटारचालक म्हणून काम करत होता. त्या वेळी त्याने महिलांना मोटारीतून सोडण्याच्या बहाण्याने त्यांना लुटले होते. याप्रकरणात अन्य तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येणार असल्याने गाडेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी युक्तिवादात केली.

बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीस विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने गाडे याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. न्यायालायच्या आदेशानुसार गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.