लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून पुणे पोलीस यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘धक्कादायक म्हणजे, त्या पहाटे दोनदा बलात्कार केल्यानंतर दत्तात्रय गाडे याने तिसऱ्यावेळी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोरदार विरोधानंतर नराधम गाडे पळून गेला’, असे तिने सचिवांच्या निदर्शनास आणून दिले असून ॲड. असीम सरोदे यांनाच विशेष सरकारी वकिल म्हणून नेमावे, अशी मागणी केली आहे.

वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत पीडित तरुणीने प्रश्न उपस्थित केले असून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र, उशीर झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

वैद्यकीय चाचणीवेळी तिच्या इच्छेविरुद्ध पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वारंवार वर्णन करावे लागले, याकडे पीडितेने पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

‘तीन वकिलांची नावे सुचवली जातील. त्यातून एकाची निवड कर’, असे असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. पण, मला कल्पना न देताच सरकारी वकिलांची नेमणूक केली गेली. असीम सरोदे यांची निवड करण्याची मागणी केली तेव्हा एक दिवस उशीर झाला. आम्ही प्रस्ताव पाठविला असल्याचे मला सांगण्यात आले, असे नमूद करण्यात आले असून ‘वकील निवडण्याचा अधिकार मला नाही का?,’असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केला आहे.

म्हणून मी शांत राहिले

अत्याचार होत असताना मी ओरडले. पण, माझा आवाज बसला आणि तोंडातून शब्द बाहेर पडेनात. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. अनेकांना दिलेला त्रास आठवला. त्यामुळे जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे वाटल्याने मी शांत राहिले असेही पीडित तरुणीने पत्रात म्हटले आहे.

तरुणीच्या चारित्र्यावर संशय

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने दोन वेळा बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पुणे पोलिसांनी गुनाट या गावातील शेतात लपून बसलेल्या आरोपी गाडेला बेड्या ठोकल्या. त्यापूर्वी तरुणीच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला गेला. त्या दोघांची ओळख होती, असेही सांगितले गेले. तर गाडेच्या वकिलांनीच तिने पैसे घेतल्याची खोटी माहिती दिली. यामध्ये पीडित तरुणीला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागेल होते.