पुणे : स्वारगेट बस स्थानकात बलात्कारप्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शिरुर तालुक्यातील गुणाट गावातून अटक करण्यात आली आहे. या आरोपीला लष्कर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून काही वेळात आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र लष्कर पोलीस स्टेशनबाहेर युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि गृहमंत्री, पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी पहाटेच साडेपाच वाजण्याच्या सुमारास २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलने करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी १३ ठिकाणी पथके रवाना केली होती. तसेच आरोपीचा तांत्रिकदृष्ट्या विश्लेषणाद्वारेदेखील शोधा घेतला जात होता. तर आरोपीने मागील दिवसात ज्या ज्या व्यक्तीना फोन केले होते त्या सर्व व्यक्तींकडे पोलिसांमार्फत चौकशी केली जात होती. त्याचदरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला शोधून देणार्या नागरिकाला पुणे पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीसदेखील जाहीर केले होते. तर आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुर तालुक्यातील गुणाट या गावातील असल्याने आरोपीच्या गावामध्ये जाऊन पुणे पोलिसांनी ड्रोन आणि श्वान पथकाच्या माध्यमांतून शोध घेतला. मात्र अनेक अडथळ्यांचा सामना करीत तब्बल ७० तासांनंतर आरोपी दत्तात्रय गाडे या आरोपीला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.