पुणे : स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित भुयारी मेट्रो मार्गावर बदल करण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. या भागातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पाच्या खर्चात २०० ते ३०० कोटी रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. स्वारगेट ते पिंपरी चिंचवड हा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज असे मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विस्तारित मेट्रो मार्गाचे भूमिपूजन दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले आहे. या विस्तारीकरणाच्या मेट्रो प्रकल्पात तीन मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार होती. मात्र लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची मागणी लक्षात घेऊन या मार्गावर चौथे मेट्रो स्टेशन देखील आता उभारले जाणार आहे. बालाजीनगर येथे हे नवीन स्थानक उभारण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला असून, यासाठी पुणे महापालिकेने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

हेही वाचा : कात्रज चौकात आजपासून वाहतूकबदल, उड्डाणपुलाच्या कामानिमित्त पर्यायी मार्ग

या मेट्रो मार्गावर आता तीनऐवजी चार स्थानके होणार असल्याने बालाजीनगर, धनकवडी या परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. नवीन स्थानक उभारताना त्याचा आर्थिक भार महापालिका घेणार नाही, या अटीवर ही परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन स्थानकाचा खर्च महामेट्रोला करावा लागणार आहे.

स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये (डीपीआर) मार्केटयार्ड, पद्मावती, कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. पद्मावतीनंतर थेट कात्रजला मेट्रोचे स्थानक असल्याने धनकवडी, बालाजीनगर परिसरातील प्रवाशांची अडचण होण्याची शक्यता होती. बालाजीनगर भागात चौथे स्थानक उभारावे, अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. तसेच काही वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊन स्थानक उभारण्याचा ठरावदेखील करण्यात आला होता. या विस्तारित मार्गाचे भूमिपूजन झाल्यानंतर मेट्रो स्थानकाची मागणी जोर धरत होती. नवीन स्थानक करायचे झाल्यास त्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव महत्त्वाचा असतो. मात्र, यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाला अनेक वर्षे झाल्याने महामेट्रोने पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे नवीन ठराव करून देण्याची विनंती केली होती.

हेही वाचा : वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाचे अनधिकृत भूमिपूजन?

बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानक उभारण्यास प्रशासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. नवीन स्थानक उभारताना त्याचा कोणताही आर्थिक भार महापालिकेवर असणार नाही, अशी अटदेखील यामध्ये घालण्यात आली आहे. स्थानकासाठी आवश्यक ती जागा महापालिका देणार असून, उभारणीचा संपूर्ण खर्च महामेट्रो करणार आहे.

या भागातील लोकप्रतिनिधी, तसेच प्रवाशांची स्टेशनसाठी होत असलेली मागणी विचारात घेत महामेट्रोने येथे पाहणी केली. मेट्रोच्या दोन स्थानकांमधील अंतर एक ते दीड किलोमीटरपेक्षा अधिक नसावे, असा नियम आहे. मात्र, या विस्तारित मेट्रो मार्गाच्या पद्मावती ते कात्रज या स्थानकातील अंतर १.९०० इतके आहे. त्यामुळे ही मागणी लक्षात घेत बालाजीनगर येथे नवीन स्थानक उभारण्याची तयारी मेट्रोने दाखविली असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाचे अनधिकृत भूमिपूजन?

स्वारगेट-कात्रज विस्तारित मार्गाची वैशिष्ट्ये

  • ५.४६३ किलोमीटर लांबीचा मार्ग
  • विस्तारित मेट्रोच्या प्रकल्प खर्चासाठी २९५४.५३ कोटी रुपयांना मान्यता
  • पुणे महापालिकेचा हिस्सा १८१.२१ कोटी रुपये
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानकातील अंतर १.९ किलोमीटर
  • धनकवडी, बालाजीनगर, के. के. मार्केट परिसरातील प्रवाशांना सोयीस्कर
  • नवीन स्थानकाच्या समावेशामुळे प्रकल्प खर्च २०० ते ३०० कोटींनी वाढण्याची शक्यता
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swargate to katraj metro project fourth balajinagar metro station approved by pune municipal corporation pune print news ccm 82 css