प्रयोगशील शाळांना चांगला प्रतिसाद मिळत असला तरी बहुतांशी पालकांचा कल आपल्या पाल्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देण्याकडे आहे. ही बाब लक्षात घेत मुख्य प्रवाहातील शिक्षणाबरोबरच विविध खेळ, अभिनय, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील पाच तरुण-तरुणींनी एकत्र येत ‘स्वार्क’ची स्थापना केली आहे. आपापली नोकरी, व्यवसाय सांभाळून हे पाच जण शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करतात. पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरांमधूनही त्यांना कार्यशाळा घेण्यासाठी बोलावणे येते. भारतासह जगभरात पाठय़पुस्तकांव्यतिरिक्त प्रयोगशील शिक्षणासाठी काय काय प्रयत्न, प्रयोग सुरू आहेत याचा अभ्यास करून अधिकाधिक उपक्रमांच्या माध्यमातून मुलांच्या संकल्पना स्पष्ट करण्याकडे स्वार्कचा भर आहे.

स्व म्हणजे स्वत:चा शोध व जाणीव होणे आणि अर्क म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा अर्क काढणे म्हणजेच स्वअर्क. या दोन शब्दांचे एकत्रीकरण करून ‘स्वार्क’ असे नाव संस्थेला देण्यात आले आहे. चैत्राली रहाळकर, नेहल पिंपळखरे, यश पाडळकर, अद्वैत रहाळकर आणि निनाद काळे अशा पाच जणांनी मिळून स्वार्कची स्थापना केली आहे. हे पाचही जण महाविद्यालयीन सहकारी आहेत. चैत्राली यांनी संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून गेल्या सहा वर्षांपासून संस्कृत शिक्षिका म्हणून त्या कार्यरत आहेत. यश आणि अद्वैत यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून ते सनदी लेखापाल होण्यासाठी तयारी करत आहेत. स्नेहल यांनी मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून दोन वर्षे काम केले आहे. निनाद यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. अशा विविध क्षेत्रांतून एकत्र येत आपापले क्षेत्र सांभाळत स्वार्कसाठी हे सर्वजण काम करतात. स्वार्कची स्थापना २०१७ मध्ये करण्यात आली असून पार्टनरशिप फर्म म्हणून नोंदणी केली आहे.

चैत्राली गेली सहा वर्षे अध्यापनाचे काम करत आहेत. हे करत असताना विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या समस्या त्यांना जाणवल्या. केवळ पाठय़पुस्तके, गृहपाठ या पलीकडे जाऊन शाळेत घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग दैनंदिन जीवनात व्हायला हवा. मुख्य प्रवाहातील शिक्षणपद्धती सोडून पाल्याला प्रयोगशील शाळांमध्ये शिक्षण देणे सर्व पालकांना शक्य होत नाही. तर, प्रयोगशील शिक्षण चांगले, मात्र अशा प्रकारच्या शाळांमध्ये पाल्याला कायमस्वरूपी घालण्यासाठी पालक तयार होत नाहीत. हे लक्षात घेऊन मुख्य प्रवाहातल्या शाळकरी मुला-मुलींसाठी प्रात्यक्षिकांमधून पूरक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आणि एकाच गोष्टीकडे विविध दृष्टिकोनातून पाहता यावे, विषयाची माहिती त्यांना कळावी, या हेतूने कार्यशाळा व शिबिरे आयोजित करण्याची कल्पना चैत्राली यांच्या मनात आली. त्यांनी ही कल्पना आपल्या मित्रांना बोलून दाखवली आणि त्यातून स्वार्क स्थापना झाली.

सुरुवातीचे सहा महिने पाचही जणांनी त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी काय करता येईल? भारतासह जगभरात प्रयोगशील शिक्षणासाठी काय काय प्रयत्न, प्रयोग सुरू आहेत याचा अभ्यास केला. त्यातून जास्तीत जास्त उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना संकल्पना स्पष्ट करून सांगण्यावर सर्वाचे एकमत होऊन विविध प्रयोग, नाटय़खेळ यांच्या माध्यमातून मुलांना प्रयोगशील शिक्षण देण्याचे ठरले. हा अभ्यास करत असतानाच अशा प्रकारच्या शिक्षणाचा शास्त्रीय दृष्टिकोन, पाल्य, पालकांची मानसिकता याबद्दलही त्यांनी अभ्यास केला.

‘मी मूळची पनवेलची असून शालेय शिक्षण लोधीवली येथील ज. हि. अंबानी विद्यालयात झाले आहे. शाळेच्या रौप्य महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थ्यांबरोबर एक उपक्रम करण्याचे शाळेने ठरवले होते. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करताना स्वार्कबद्दल सांगितले. त्यांनी एक कार्यशाळा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्याची कल्पना दिली आणि आम्हा पाच जणांना पहिल्यांदाच आमच्या कल्पना प्रत्यक्ष मांडण्याची संधी मिळाली. त्यानुसार दोन दिवसांची निवासी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आम्हालाही हुरूप आला. आमच्या कल्पना मुलांपर्यंत पोहोचल्याचे समाधान या निमित्ताने मिळाले’, असे चैत्राली रहाळकर यांनी सांगितले.   स्वार्ककडून स्व: जाणिवा जागरूक होणारे खेळ घेतले जातात. या खेळांमधून आपल्या स्वत:मध्ये असणाऱ्या विविध गुणांची मुलांना जाणीव होते. सर्जनशीलता वाढीसाठीचे विविध खेळ घेतले जातात. अशाप्रकारे विज्ञान, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र असे विविध विषय खेळ, प्रात्यक्षिके, नाटय़खेळ यांच्या माध्यमातून मुलांकडून करून घेतले जातात. दृश्यमान गोष्टी मुलांच्या चांगल्याप्रकारे लक्षात राहतात, हे सूत्र लक्षात घेऊन खेळांची रचना करण्यात आली आहे. शारीरिक हालचाली, अभिनय आणि प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. माणसाला विशेषत: लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक नजरेने पाहण्याचे एक प्रकारचे कुतूहल त्यांच्याकडे असते. हाच मुद्दा घेऊन पुण्यातील कोथरुड येथे ‘तुकूहल’ नावाची तीन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या नावापासूनच कुतूहल निर्माण व्हावे, या हेतूने कार्यशाळेचे नाव तुकूहल ठेवण्यात आले होते. पुण्यात पहिल्यांदाच कार्यशाळा घेत असल्याने भित्तिपत्रके काही ठिकाणी लावली. समाजमाध्यमातून प्रसार केला. विशेष म्हणजे या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला असून अशाप्रकारच्या कार्यशाळा विविध भागात घेण्याच्या सूचना अनेक पालकांकडून आल्या.

‘स्वार्क अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक पेज तयार केले आहे. फेसबुक, वॉट्स अ‍ॅप अशा समाजमाध्यमातून प्रचार व प्रसार केला जात आहे. स्वार्कची आर्थिक बाजू सांभाळून पुण्यातील बाणेर, पाषाण, सहकारनगर, सिंहगड रस्ता, शहराचा मध्यभाग अशा विविध भागांत कार्यशाळा आयोजित करण्याचा आम्हा पाचही जणांचा मानस आहे. जेणेकरून त्या त्या भागातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्यासाठी शहरातील सोसायटय़ांना भेट देऊन स्वार्कचे काम सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी कार्यशाळा घेत आहोत. त्याबरोबरच दहापेक्षा कमी वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सुट्टीबरोबरच

शनिवार-रविवारी येत्या जून-जुलै महिन्यात कार्यशाळा घेण्याचा मानस आहे’, असेही चैत्राली रहाळकर यांनी सांगितले.

prathamesh.godbole@expressindia.com

Story img Loader