‘देवीच्या मंदिरांमध्ये महिला पुजारी असणे गरजेचे असून ही मागणी ‘भूमाता ब्रिगेड’च्या माध्यमातून राज्यभरात केली जाईल. कारण हा देवीचा अपमान आहे,’ असे मत संघटनेच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
देसाई व ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादक आरती कदम यांच्या उपस्थितीत ‘लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३ डी २’ यांच्यातर्फे गुरूवारी अकरा महिलांना ‘स्वयंसिद्धा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.
लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्रीकांत सोनी, जयश्री पेंडसे, शैलजा सांगळे, नीता शहा, सुनीता शिर्के आदी या वेळी उपस्थित होते. सोजल दरवडे, जाई खामकर, अंबू गोविंदगिरी, प्रतिभा डेंगळे, शोभना मंत्रवादी, उषा राऊत, अनुराधा जाधव, ज्योती पुंडे, सुखदा साने, हर्षां शहा, डॉ. राजश्री महाजनी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
देसाई म्हणाल्या,‘‘आताच आम्हाला ‘स्टंट’ करणारे, देशद्रोही व धर्मद्रोही म्हटले जाते. महिला पुजाऱ्यांचा विषय घेतल्यावर काय म्हटले जाईल! आम्ही  स्टंट करतो असे जे म्हणतात त्यांनी आम्हाला दर्शन घ्यायला सोडावे. तसे केल्यावर स्टंट होणारच नाही. आम्ही दर्शन घेऊ व विषय संपेल. विरोध करणाऱ्यांना महिलांच्या लढाईची धार कमी करायची आहे. विरोध वैचारिक व्हावा. सोशल मीडियावर माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला व माझ्या नावाने अश्लील फोटो पसरवले गेले. अजित बँकेच्या आंदोलनात मला जेव्हा खुनाच्या धमक्या आल्या तेव्हा पोलीस मला विचारायला आले नाहीत. आम्ही हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मात्र आम्हाला ताब्यात घेतले जाते.’’
‘‘पत्रकारितेत ‘ग्लॅमर’ असले तरी ते खूप जबाबदारीचे काम आहे. बदलत्या स्त्रीची सकारात्मक ऊर्जा, ग्रामीण भागातील पुढे येणाऱ्या स्त्रिया आणि आपल्या आजूबाजूला चालणारी सामाजिक कार्ये यांना ‘चतुरंग’च्या माध्यमातून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला,’’ असे कदम यांनी सांगितले.

‘सहकाऱ्यांकडूनच पाय खेचण्याचा प्रयत्न’

‘‘माझ्याबरोबर आंदोलनात असणाऱ्या वा माझ्या ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्यां मलाच इतकी प्रसिद्धी कशी मिळाली अशा विचाराने माझ्या बदनामीचा विचार करतात. माझ्या आंदोलनाला यश मिळाल्यावर आमच्यातीलच काही महिला बाजूला झाल्या. महिलांनीच महिलांचे पाय खेचणे सुरू आहे,’’ असे तृप्ती देसाई म्हणाल्या.