जेवायला कुठे जायचं, चांगली थाळी कुठे मिळेल या विषयावरील चर्चेत ‘स्वीकार’ हॉटेलमध्ये मिळणाऱ्या थाळीचं नाव निघालं नाही असं कधीच होत नाही. वैविध्यपूर्ण पदार्थ आणि तेही घरगुती चवीचे हे ‘स्वीकार’च्या थाळीचं वैशिष्टय़. कोकणी, महाराष्ट्रीय आणि कारवारी अशा वेगवेगळय़ा चवींच्या मिश्रणाची इथली थाळी आपल्याला पूर्ण भोजनाचा आनंद देते.
उत्तर कर्नाटकमधून म्हणजे प्रामुख्यानं कारवार वगैरे भागातून महाराष्ट्रात येऊन ज्या मंडळींनी हॉटेल व्यवसायात उत्तम स्थान निर्माण केलं, त्यात स्वीकार हॉटेलचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. नळ स्टॉप चौकातून म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेलं हे हॉटेल पै कुटुंबीयांनी सुरू केलेलं आहे. कारवारहून साधारण सत्तर वर्षांपूर्वी व्यंकटराव पै हे त्यांचा पुतण्या सर्वोत्तम याला घेऊन कामाच्या शोधात पुण्यात आले. गावाकडे त्यांची थोडी शेतीवाडी होती. तिथून पुण्यात आल्यानंतर सुरुवातीला व्यंकटराव पै लॉ कॉलेजच्या खाणावळीत कामाला लागले. तेथील कामाचा अनुभव गाठीशी आल्यानंतर पुतण्याला मदतीला घेऊन त्यांनी बीएमसीसीची खाणावळ चालवायला घेतली. त्यातूनच पुढे ते आयएमडीआरचीही खाणावळ चालवू लागले. हळूहळू अनुभव वाढला. व्यवसायातही जम बसला. त्यातून रिझव्र्ह बँकेचं प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र बँकेचं प्रशिक्षण केंद्र, महात्मा फुले वसतिगृह इथल्याही मेसचं व्यवस्थापन त्यांच्याकडे आलं. नंतर या व्यवसायात त्यांची अन्य कुटुंबीय मंडळीही आली. पुढे व्यंकटरावांचे पुतणे सर्वोत्तम पै आणि श्रीनिवास पै यांनी ‘स्वीकार’ सुरू केलं.
स्वीकारमध्ये जेवणासाठी म्हणजे इथल्या थाळीसाठी अनेक जण आवर्जून जातात. अनेक ग्रुपही त्यासाठी येतात. घडीच्या गरम गरम पोळ्या किंवा गरम गरम पुऱ्या, भात, सुकी किंवा रस्सा भाजी, उसळ, बटाटा रस्सा किंवा उकडलेल्या बटाटय़ाची किंवा बटाटा काचऱ्यांची भाजी, आमटी, कोशिंबीर, दही, पापड असा इथल्या थाळीचा परिपूर्ण बेत असतो. या प्रत्येक पदार्थाचं चवीष्ट असंच वर्णन करता येईल. रोजच्या जेवणात एक याप्रमाणे किमान दहा-पंधरा प्रकारच्या उसळी इथे असतात. शिवाय भाज्याही सर्व प्रकारच्या असतात. कोशिंबीर हाही या थाळीतला एक वैशिष्टय़पूर्ण प्रकार. काकडी, गाजर, बीट आदींच्या कोशिंबिरी किंवा भरीत हे इथले खाद्यप्रकार. इथल्या थाळीत दिली जाणारी आमटी ही देखील या थाळीची खासियत आहे. चिंच-गुळाची ही आमटी कोणीही तारीफ करेल अशीच असते. परिपूर्ण आणि पारंपरिक जेवणाचा अनुभव अशी ही थाळी असते. सर्व पदार्थामध्ये ओल्या नारळाचा सढळ हस्ते वापर केला जातो. शिवाय मसाले आणि पदार्थ तयार करण्याच्या पद्धती या पूर्वापार जपण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पदार्थ रुचकर होतो आणि जेवणाची लज्जत वाढवतो. ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी इथले गरम गुलाबजाम किंवा श्रीखंड वा फ्रुटसॅलड ही पर्वणीच असते.
ज्यांना थाळी नको असेल आणि पंजाबी डिशची आवड असेल, त्यांच्यासाठीही इथे वेगवेगळ्या खास चवींच्या भाज्या मिळतात. त्यांचंही वेगळेपण जपण्यात आलं आहे. शिवाय दाक्षिणात्य पदार्थही असतातच.
या शिवाय अलीकडेच इथे दर रविवारी सकाळी विशेष नाश्ता सुरू करण्यात आला आहे. त्यात कारवारी बन्स, डाळ वडा, हिरव्या रश्श्याची स्पेशल मिसळ, पुरी आणि बटाटय़ाची पातळ रस्सा भाजी, शिरा असे पदार्थ असतात. शिवाय शिरा, उपमा, मेदूवडा, इडली आणि कॉफी किंवा चहा असा कॉम्बो ब्रेकफास्टही सकाळी घेता येतो.
व्यंकटराव पै यांनी मेस चालवताना जे मार्ग आखून दिले, त्या मार्गानं आणि त्यांनी घालून दिलेल्या घडीनुसारच स्वीकारही चालवलं जातं. त्यामुळे दर्जेदार आणि चवीष्ट पदार्थ ही खासियत कायम आहे. ते मनानं अत्यंत दिलदार होते. आपल्याकडे येणारा प्रत्येक जण समाधानानं परतला पाहिजे हे त्यांचं व्यवसायाचं मुख्य सूत्र होतं. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. आलेला प्रत्येक जण जेवल्यानंतर समाधानानं गेला पाहिजे असं ते सांगायचे.
त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा खूप अडचणी होत्या. सोयी-सुविधा, साधनं नव्हती. तरीही मोठय़ा कष्टानं त्यांनी त्यांचा व्यवसाय नावारूपाला आणला. त्याचे धडे सर्वोत्तम आणि श्रीनिवास पै यांना आणि पुढची पिढी म्हणजे अजित पै यांना मिळाले. थाळीसाठी सर्वोत्तम आणि श्रीनिवास यांनी जो पॅटर्न ठरवून दिला त्यानुसारच आम्ही थाळी देतो, असं अजित पै सांगतात. घरगुती चव आणि पदार्थाचं वैविध्य याचा अनुभव ही थाळी नक्की देते.
स्वीकार व्हेज रेस्टॉरंट
- कुठे? नळ स्टॉप ते म्हात्रे पूल रस्ता
- केव्हा? सकाळी नऊ ते रात्री अकरा
- संपर्क : २५४३५६५९