पुरंदर तालुक्यातील गोड चवीच्या मोठ्या आकाराच्या अंजीरांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अंजीराला चांगला बाजारभाव मिळत असल्याने अंजीरबागा लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पुरंदर तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येथील शेतकऱ्यांनी धडपड करून, आवश्यक तेवढेच पाणी वापरून अंजीर, सीताफळ, पेरू आदि फळबागा फुलवल्या आहेत. दमट हवामानात कमी पाण्यावर येणारे येथील अंजीर गोड चवीचे व मोठ्या आकाराचे असल्याने सर्वत्र प्रसिद्ध आहे. पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये पुरंदरची अंजीर मोठा भाव खातात. या अंजीराची गोड चव बराच वेळ जिभेवर रेंगाळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरंदरच्या अंजीराची दखल घेतली. पुरंदरची अंजीर काही वर्षांपूर्वी स्थानिक बाजारपेठेत दिसत होती, परंतु आता ही अंजीर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे जाहीर कौतुक केले. जो शेतकरी एकेकाळी स्थानिक बाजारपेठेपुरता मर्यादित होता त्याची उत्पादने आता जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध होत आहेत. पुलवामामधील स्नो पिक्स, काश्मीरमधील क्रिकेट बॅट आणि पुरंदरचे अंजीर आता जगाच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत. अशा शब्दात त्यांनी पुरंदरच्या अंजीराचा गौरव केला.

२०२२ मध्ये फिले टेली दिनाच्या मुहूर्तावर एका टपाल तिकिटावर अंजिराचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाने पुरंदरमध्ये अंजीरावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना भविष्यामध्ये शासनाकडून अधिक प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. गुरोळी, सोनोरी, काळेवाडी, सिंगापूर, पारगाव, पिंपळे, दिवे, वनपुरी आदि गावांसह तालुक्याच्या अनेक भागात अंजीराच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. प्रामुख्याने पावसाळा व हिवाळ्यात खट्टा तर उन्हाळ्यात मिठा बहर घेतला जातो. येथील शेतकरी प्रामुख्याने सेंद्रिय शेतीचा वापर करतात. जिद्द व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.

पुरंदर तालुक्यात पाण्याचे स्त्रोत कमी असल्याने पुरंदर तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून संबोधले जाते. मात्र येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्ट करून हरित क्रांती केली आहे. फळबागा लावल्या आहेत. दिवे येथे काही वर्षांपूर्वी सीताफळ आणि अंजीर संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली असून येथे अनेक नवनवीन प्रजाती निर्माण करण्यात आल्या आहेत. पुरंदर तालुक्यामध्ये ४५२ हेक्टर क्षेत्रावर अंजिराच्या बागा आहेत. काळेवाडी व जाधववाडी येथील अंजीर प्रक्रिया उद्योगांमध्ये आईस्क्रीम, अंजीरबर्फी, रबडी आदि पदार्थांची निर्मिती होते. संपूर्ण भारतासह युरोपलाही येथून माल पाठवला जातो .
अनेक शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये शेततळी भरून घेऊन त्या पाण्यावर बागा जगवल्या आहेत. सध्या बागेतील झाडे अंजीराच्या फळांनी बहरली असून दररोज फळे तोडण्याचे काम सुरू आहे अंजिराचा खट्टा बहर सुरू असून जसे ऊन वाढेल तशी त्याची गोडी वाढते. येथून अनेक व्यापारी जागेवरच माल खरेदी करून पुणे, मुंबई,चेन्नई आदि शहरी भागात पाठवत आहेत .सध्या बांधावरच अंजीराला १२० रुपये ठोक भाव मिळत असल्याने बळीराजा खुशीत आहे.

एका झाडापासून तीन ते चार हजार रुपये उत्पन्न

जेजुरीजवळ असलेल्या भोरवाडी येथील अंजीर उत्पादक शेतकरी तुषार कैलास लवांडे यांनी आपल्या कोरडवाहू जमिनीत १२० अंजिराची झाडे लावली आहेत. शेततळ्यात साठविलेल्या पाण्यातून त्यांनी ही बाग फुलवली.

सध्या खट्टाबहर सुरू असून दररोज झाडावरून अंजीर काढण्याचे काम सुरू आहे . एका झाडापासून वर्षाला तीन ते चार हजार रुपये उत्पन्न मिळतात . हा बहर चार महिने सुरू राहील असे त्यांनी सांगितले.