पुणे : महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रताळय़ांची मोठी आवक झाली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा रताळय़ाच्या लागवडीत घट झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारात एक किलो गावरान रताळय़ांची विक्रमी १०० ते १२० रुपये प्रतिकिलो तसेच कर्नाटकातील रताळय़ांची ७० ते ८० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री करण्यात येत आहे.
महाशिवरात्री उपवासानिमित्त रताळय़ांना मोठी मागणी असते. गेल्या वर्षी रताळय़ांना अपेक्षेएवढे दर न मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रताळय़ांची लागवड कमी केली. रताळय़ावर पडलेल्या किडीमुळे लागवडीतही घट झाल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत रताळय़ांच्या दरात वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील रताळी व्यापारी अमोल घुले यांनी दिली.
घाऊक बाजारात कराड, बीड, सोलापूर जिल्ह्यातून रताळी विक्रीस पाठविण्यात येत आहेत. कर्नाटकातील बेळगाव भागातून रताळय़ांची आवक झाली आहे. कर्नाटकातील रताळय़ांच्या तुलनेत गावरान रताळय़ांना चांगली मागणी आहे. घाऊक बाजारात सोलापूर, बीड, कराड भागातून ५०० ते ५५० गोणी रताळय़ांची आवक झाली.
एक एकरावर रताळय़ांची लागवड करण्यात आली. साधारणपणे एकरी ५० गोणी रताळय़ांचे उत्पादन मिळते. या वर्षी रताळय़ांवर पडलेल्या किडीमुळे एकरातून ३० गोणी रताळय़ांचे उत्पादन मिळाले. उत्पादन कमी झाले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा रताळय़ांना चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
– भिका शिवा राऊत, रताळी उत्पादक शेतकरी, मोरवड, ता. करमाळा, जि. सोलापूर