लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावाचे तिकीट आणि पास दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. आता ४५ मिनिटे पोहोण्यासाठी १० ऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, मासिक, तिमाही व वार्षिक पास दरात वाढ करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

महापालिकेच्या वतीने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरीगाव, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. जलतरण तलावातून मिळणारे उत्पन्न व त्यावर होणार खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी जलतरण तलाव शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील १९ विद्यार्थी ‘लखपती’

जलतरण तलावात पोहण्याची एक तुकडी ४५ मिनिटांची असते. त्यासाठी पूर्वी १० रुपये शुल्क होते. आता २० रुपये मोजावे लागणार आहेत. १२ ते ६० वयोगटांतील सर्व नागरिकांना एका महिन्याच्या पाससाठी ४०० ऐवजी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर तिमाहीसाठी ७००ऐवजी एक हजार २०० रुपये दर आहे. वर्षभराच्या पाससाठी एक हजारऐवजी चार हजार ५०० रुपये भरावे लागणार आहेत. लॉकर फी तीन महिन्यांसाठी ५० ऐवजी ३०० रुपये व वर्षासाठी १०० ऐवजी एक हजार २०० रुपये असणार आहे. स्पर्धा, सराव, शिबिरासाठी शाळा, महाविद्यालय, कंपनी, क्लब यांना नेहरूनगर तलावाचे एका तासाचे भाडे दोन हजार रुपये असणार आहे. उर्वरित १२ तलावांचे भाडे एक हजार ५०० रुपये आहे.

राष्ट्रीय खेळाडूंना ५० टक्के सवलत

बारा वर्षांखालील मुले व मुली, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांना मासिक, तिमाही व वार्षिक पाससाठी ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. नगरसेवक, खेळाडू दत्तक योजनेतील जलतरण खेळाडू, पालिका शाळेचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग नागरिक यांना पोहोण्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे.

महापालिकेच्या जलतरण तलावांचे दर कमी होते. २००८ मध्ये दर वाढविले होते. पंधरा वर्षे दरात कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे दरवाढ केली आहे. -मनोज लोणकर, उपायुक्त क्रीडा विभाग