पुण्यात स्वाईन फ्लूमुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील एक रुग्ण धायरीतील, तर दुसरा रुग्ण शुक्रवार पेठेतील रहिवासी होता. जानेवारीपासून पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या यामुळे १२ झाली आहे. यातील ५ रुग्ण पुण्यात राहणारे होते, तर ७ जण पुण्याबाहेरुन येथे उपचारांसाठी आले होते.
धायरीतील गणेश नगरमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षांच्या महिलेचा बुधवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. या महिलेला स्वाईन फ्लू झाल्याचे निदान राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेतर्फे (एनआयव्ही)२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. स्वाईन फ्लूबरोबर गंभीर जंतूसंसर्ग (सेप्टिक शॉक) आणि न्यूमोनिया यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले आहे. या महिलेस उपचार घेण्यास तीन दिवसांचा उशीर झाला होता. शुक्रवार पेठेतील राहणाऱ्या ५५ वर्षांच्या पुरूषाचा गुरूवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. ३ फेब्रुवारीला या व्यक्तीस स्वाईन फ्लू झाल्याचे निदान एनआयव्हीमार्फत करण्यात आले होते. या व्यक्तीचा मृत्यूदेखील स्वाईन फ्लूबरोबर गंभीर जंतूसंसर्ग होऊन मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे झाला.
‘स्वाईन फ्लूबरोबरच्या दुय्यम संसर्गाकडे
वेळीच लक्ष पुरवणे गरजेचे’
– ‘एनआयव्ही’चे सांगणे
– विषाणूची जनुकीय रचना पूर्वीचीच असल्याचा पुनरुच्चार
प्रतिनिधी, पुणे
स्वाईन फ्लूच्या विषाणूची जनुकीय रचना बदललेली नसून त्याबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही, असे राष्ट्रीय विषाणूविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक डॉ. डी. टी. मौर्य यांनी गुरुवारी पुन्हा स्पष्ट केले. ‘स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूमागे केवळ स्वाईन फ्लू (पॅनडेमिक इन्फ्लुएन्झा) हे एकच कारण नाही, रुग्णाला झालेल्या इतर दुय्यम संसर्गाकडेही वेळीच लक्ष पुरवणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
राज्यात शुक्रवारी स्वाईन फ्लूचे ५७ नवीन रुग्ण आढळले असून आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या २९६ झाली आहे. एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात ३ जण मध्य प्रदेशचे असून गुजरात, आंध्र प्रदेश व उत्तर प्रदेशच्या प्रत्येकी एका रुग्णाचा महाराष्ट्रात मृत्यू झाला आहे. सध्या विविध जिल्ह्य़ांमध्ये १२० स्वाईन फ्लूचे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
डॉ. मौर्य म्हणाले, ‘‘स्वाईन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूमागे केवळ स्वाईन फ्लू (पॅनडेमिक इन्फ्लुएन्झा) हे एकच कारण नाही. इतर विषाणू व जीवाणूंमुळे श्वसनमार्गाला होणाऱ्या संसर्गाचाही घातक परिणाम होऊ शकतो. देशाचा विस्तार, हवामानातील विविधता आणि लोकसंख्या या सर्व गोष्टी हाताळणे शासकीय यंत्रणेला शक्य होतेच असे नाही. श्वसनमार्गाच्या संसर्गाने ग्रस्त रुग्णाची स्थिती गंभीर असल्यास ताबडतोब ‘टॅमी फ्लू’सारखी ‘अँटीव्हायरल’ औषधे सुरू केली जातात. पण विषाणूसंसर्गासह त्या रुग्णाला आणखी एखादा दुय्यम संसर्ग झाला आहे का हेही लक्षात घेणे आवश्यक ठरते. अशा दुय्यम विषाणू किंवा जीवाणूसंसर्गावरही बरोबरीने उपचार करावे लागतात.’’
स्वाईन फ्लूच्या विषाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला नाही, असे सांगून डॉ. मौर्य म्हणाले, ‘‘स्वाईन फ्लूच्या विषाणूची सध्याची जनुकीय रचना ‘कॅलिफोर्निया’ विषाणूच्या जनुकीय रचनेशी मिळतीजुळती आहे. एनआयव्हीतर्फे सातत्याने स्वाईन फ्लूच्या विषाणूचा अभ्यास सुरू असून सध्या याबाबत काळजीचे कोणतेही कारण नाही.’’
‘सध्या डॉक्टरांनी स्वाईन फ्लूच्या चाचणीच्या निष्कर्षांसाठी थांबण्याची गरज नाही. आजार गंभीर वाटल्यास तातडीने टॅमी फ्लू सुरू करणे, गरज भासल्यास रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवणे आणि त्याची काळजी घेण्यासाठी इतर उपचार सुरू करणे ही पद्धत योग्य आहे,’ असेही डॉ. मौर्य यांनी सांगितले.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १०० रुग्ण नागपूरचे, ८३ रुग्ण पुण्याचे आणि ७९ रुग्ण मुंबईत आढळल्याची माहिती आरोग्य खात्याने पुरवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा