पुण्यात एकाच दिवसात १२ नवीन रुग्ण

पावसाने घेतलेली विश्रांती, कडकडीत ऊन, पहाटे पडणारी थंडी आणि या सगळ्याच्या बरोबरीने शहरात उत्सवानिमित्त झालेली गर्दी यांमुळे स्वाइन फ्लूचा संसर्ग झपाटय़ाने वाढलेला पाहायला मिळाला. त्याचाच परिणाम म्हणून बुधवारी एकाच दिवसात बारा नवीन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या माहितीमधून ही माहिती समोर आली आहे. बुधवारी एकाच दिवसात आरोग्य विभागाकडून ५६१६ नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २११ रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. तेहतीस रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील बारा रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विविध रुग्णालयांमध्ये ११० रुग्ण उपचारांसाठी दाखल असून त्यांपैकी पंचावन्न रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान या आठवडय़ात मंगळवारी सात तर सोमवारी सहा रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.

डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसलेल्या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याच्या बरोबरीने श्वासोच्छवासाला अडथळा असलेल्या रुग्णांनी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूचे पाच दिवसांचे उपचार घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे रुग्णांनी तापाकडे दुर्लक्ष न करता अठ्ठेचाळीस तासांच्या आत डॉक्टरांकडे जाऊन टॅमिफ्लू घेणे गरजेचे आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास स्वाइन फ्लू रुग्णांना कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, स्वाइन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण शहराच्या उपनगरांमध्ये आढळत आहेत. ताप, सर्दी, खोकला झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक रुग्णांची परिस्थिती खालावल्याचे चित्र आहे. त्यामुळे यातील कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोग, यकृत, मूत्रपिंडाचे विकार, गरोदर महिला, बालके आणि मधुमेही रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

लस घेणे आवश्यक

पावसाळ्याच्या कालावधीत फ्लू, स्वाइन फ्लू, डेंग्यू अशा विषाणूजन्य आजारांचा फैलाव होण्याचे प्रमाण मागील काही वर्षांमध्ये झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी मे महिन्यात तापावरील ट्रिपल व्हॅक्सिन किंवा स्वाइन फ्लूची लस घेणे गरजेचे असून त्यामुळे या आजारांवर वेळीच प्रतिबंध करणे शक्य असल्याचे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.