पुण्यात मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७० झाली आहे. असे असले तरी कडक उन्हामुळे स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावात मात्र काहीशी घट झालेली दिसत आहे. मंगळवारी पुण्यात स्वाईन फ्लू चे १३ रुग्ण सापडले, तर राज्यातील नवीन रुग्णांची संख्या ४७ आहे.
पुण्यात जानेवारीपासून आतापर्यंत आढळलेल्या स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या ७४४ असून त्यातील ५९५ रुग्ण पूर्णत: बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यात राहणाऱ्या ३९ रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. पुण्याच्या ग्रामीण भागात राहणारे २४ रुग्ण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे २० रुग्णही स्वाईन फ्लूमुळे मृत्युमुखी पडले आहेत. सध्या पुण्यात स्वाईन फ्लूचे ८० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. यातील २० जणांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. आणखी ६ संशयित स्वाईन फ्लू रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत.
स्वाईन फ्लूच्या नवीन रुग्णांच्या संख्येत मात्र उन्हाळ्यामुळे हळूहळू घट होते आहे. आरोग्य खात्याच्या सहसंचालक डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, ‘‘स्वाईन फ्लूच्या नवीन रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मंगळवारी राज्यात ४७ नवीन रुग्ण सापडले आहेत. या आधीच्या काळात प्रतिदिवशी १०० ते १५० रुग्णही आढळले आहेत. त्या तुलनेत रोगाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे.’’
स्वाइन फ्लू रुग्णांच्या मोफत उपचारांबद्दल रुग्णालयांची मते संमिश्र
– सीजीएचएसचे दर अत्यल्प असल्याबद्दल एकवाक्यता
खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी जीवनावश्यक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवावे लागलेल्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्णांचा खर्च शासन देणार असल्याचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला. मात्र, या रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना मिळणारे दर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेनुसार (सीजीएचएस) असून ते अत्यल्प असल्याचे रुग्णालयांचे म्हणणे आहे.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा खर्च इतर वेळी दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिकच होत असल्याचा मुद्दाही खासगी रुग्णालय़ांनी समोर ठेवला आहे.  नोबल रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे म्हणाले, ‘‘अनेकदा व्हेंटिलेटरची सोय नसलेल्या इतर रुग्णालयांमधूनही आमच्याकडे रुग्णांना दाखल केले जाते. इतर कारणांसाठी रुग्णालयात येणारा रुग्ण आणि स्वाइन फ्लूचा रुग्ण यांच्या उपचारांमध्ये अनेक गोष्टींचा फरक असतो. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा एकूण खर्च जास्त असतो. वापरल्यावर फेकून द्यावे लागणारे वैद्यकीय साहित्य अधिक असते. उपचार करणाऱ्यांना स्वाइन फ्लूचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. सीजीएचएसचे दर रुग्णालयांना परवडण्याजोगे नाहीत. परंतु हा प्रश्न सर्वच रुग्णालयांना येणार आहे. अजून आम्हाला शासन निर्णय मिळालेला नाही.’’
स्वाइन फ्लूसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या खर्चापेक्षा सीजीएचएसनुसार मिळणारा दर सुमारे ५० टक्क्य़ांनी कमी असल्याचे दीनानाथ रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘सीजीएचएसचे दर कमी आहेत. परंतु संसर्गजन्य रोगांकडे नैसर्गिक आपत्तीप्रमाणे पाहायला हवे. त्या दृष्टीने सरकार देते आहे ती मदत वाईट नाही. रुग्णालयात रुग्णावर उपचार केले, परंतु त्याचे पैसे भरण्याची रुग्णाची परिस्थिती नाही, असेही अनेकदा घडते. स्वाइन फ्लूचे रुग्ण रुग्णालयात दाखल होताना त्यांनी पैशांची मोठी तरतूद करुन ठेवलेली नसते.’’
पुण्यात सध्या २० जण व्हेंटिलेटरवर
पुण्यात सध्या स्वाइन फ्लूचे ८० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. यातील २० रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पालिकेच्या नायडू रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधाच नाही. ससूनमध्ये ही सुविधा असली तरी तिथे स्वाइन फ्लूचे उपचार घेणाऱ्यांची संख्या साथीच्या सुरूवातीपासून नगण्य राहिली. त्यामुळे पुण्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांना खासगी रुग्णालयातच सेवा घेणे भाग पडले. व्हेंटिलेटरसाठी खासगी रुग्णालयात येणारा रोजचा खर्च अंदाजे ५ ते १० हजार रुपयांच्या घरात आहे. काही रुग्णांसाठी विशेष प्रकारचा व्हेंटिलेटर वापरला जात असून त्याचा खर्च दिवसाला ३० हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो.