डॉक्टरांचे मत, नागरिकांना खबरदारीचे आवाहन; ४० ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

पुणे : पुणे शहरासह राज्यात सर्वत्र स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असून त्याचे प्रमुख कारण हे रुग्णांनी उपचार सुरू करण्यात केलेली दिरंगाई हे असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नोंदवण्यात आले आहे.

पुण्यासह नाशिक, कोल्हापूर आणि इतर महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागामध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. सप्टेंबर अखेरीस राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एकशे अकरा रुग्ण स्वाईन फ्लूने दगावल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेच्या क्षेत्रातदेखील ४१ रुग्णांचा मृत्यू स्वाईन फ्लूमुळे झाल्याचे चित्र समोर आले आहे.

ससून रुग्णालयाच्या डॉ. शशिकला सांगळे म्हणाल्या, २००९ मध्ये स्वाईन फ्लू हा आजार नव्याने दाखल झाला त्यावेळी त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाकडून मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम राबवण्यात आले आणि त्याचा चांगला परिणामही दिसून आला.

या वर्षी मात्र पुन्हा एकदा स्वाईन फ्लूबाबतचे चित्र गंभीर असून राज्यातील सर्वात जास्त स्वाईन फ्लूचे मृत्यू हे चाळीस ते साठ वर्षे वयोगटातील नागरिकांचे आहेत. याचे प्रमुख कारण आजाराची लक्षणे दिसल्यावर पुरेशी विश्रांती न घेण्याबरोबरच औषधोपचार सुरू करण्यातील दिरंगाई  हे आहे. जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली की सर्वसामान्य रुग्ण तातडीने डॉक्टरांकडे जाणे टाळतो. ही लक्षणे योग्य उपचारांअभावी दोन ते तीन दिवसात गंभीर रूप धारण करतात.

‘टॅमिफ्लूचा डोस सुरू करा’

सर्दी आणि ताप ही प्राथमिक लक्षणे दिसताच पहिल्या ४८ तासांत टॅमिफ्लूचा डोस सुरू झाला असता रुग्ण संपूर्ण बरे होतात. त्यासाठी डॉक्टरांकडून निदान करून घेणे आवश्यक आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणे दिसल्यास कामाच्या तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि संपूर्ण विश्रांती घ्या. टॅमिफ्लू लिहून दिले असल्यास रुग्णांनी ते घेण्यात टाळाटाळ करू नये आणि पाच दिवसांचा डोस पूर्ण करावा. हिरव्या पालेभाज्या, लिंबू, आवळा, संत्री तसेच भरपूर पाणी प्यायले पाहिजे, असे डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.