खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर उपचार घ्यावे लागलेल्या गरजू स्वाइन फ्लू रुग्णांसाठी गतवर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या आर्थिक प्रतिपूर्ती योजनेचा विस्तार शासनाने दोन महिन्यांनी वाढवला आहे. परंतु या योजनेचा गेल्या एका वर्षांतील आढावा घेता राज्यात केवळ ४६ रुग्णांनाच ही प्रतिपूर्ती मिळाल्याचे समोर आले.
स्वाइन फ्लूच्या प्रतिपूर्ती योजनेसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी असून पुण्यात मार्च २०१६ पर्यंत फक्त १६ जणांनाच आर्थिक मदत मंजूर झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. आता ३१ मार्च रोजी शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवल्याचे जाहीर केले. १ जानेवारी २०१५ ते १ मार्च २०१५ या दोन महिन्यांमध्ये जे गरजू रुग्ण खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते त्यांनाही खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येईल, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. या अनुषंगाने आतापर्यंत किती जणांना प्रतिपूर्ती मिळाली याबाबत विचारणा केली असता चित्र उत्साहवर्धक निश्चितच नाही. वर्षभरात ४६ रुग्णांना योजनेची प्रतिपूर्ती मिळाली असून ६ रुग्णांचे अर्ज छाननी स्तरावर असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप यांनी दिली.
२० मार्च २०१५ ला योजनेचा शासन निर्णय निघाल्यानंतर पुण्यात मे महिन्याच्या मध्यापर्यंत प्रतिपूर्ती देण्यास सुरूवातच झाली नव्हती. सुरूवातीचे काही दिवस केवळ रुग्णांच्या याद्या गोळा करण्यात गेले व त्यानंतर त्यातील गरीब रुग्ण कोण याबाबत गोंधळ निर्माण झाला. ‘गरीब रुग्ण रुग्णालयात दाखल असताना डिसचार्ज घेण्यापूर्वीच रुग्णालयाकडून बिल घेऊन योजनेसाठीच्या समितीकडे दिल्यास रुग्णाला पूर्णत: मोफत उपचार मिळू शकतील,’ अशी घोषणाही झाली होती, परंतु पुण्यातील परिस्थिती पाहता ज्या बिलांच्या भरपाईसाठी मार्चपर्यंत मंजुरी मिळाली होती त्यात केवळ दोनच बिले एका रुग्णालयाची असल्याची माहिती मिळाली. बहुसंख्य रुग्णांनी रुग्णालयाच्या दराने बिल भरून मगच भरपाईसाठी अर्ज केल्याचे दिसून आले.
स्वाइन फ्लू अर्थसाहाय्य योजनेचा विस्तार वाढवला
स्वाइन फ्लूच्या प्रतिपूर्ती योजनेसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी असून पुण्यात मार्च २०१६ पर्यंत फक्त १६ जणांनाच आर्थिक मदत मंजूर झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 05-04-2016 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu fund increased development assistance scheme