स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरणारा एच१एन१ विषाणू आता चक्क ‘पुण्याचे विषाणू मानचिन्ह’ या किताबाचा दावेदार बनला आहे! पुण्याची मानचिन्हे निवडण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या नामांकनांमध्ये ‘पुण्याचा विषाणू’ हा प्रकार समाविष्ट करण्यात आला असून त्यात एच१एन१ बरोबरच पपईच्या झाडांचे नुकसान करणारा ‘पपया रिंगस्पॉट व्हायरस’ हा देखील स्पर्धेत आहे.
रविवारी निश्चित करण्यात आलेल्या या नामांकनांसाठी झालेल्या चर्चेत विषाणू या प्रकाराचा समावेश करताना विषाणू हे ‘मानचिन्ह’ कसे असू शकते, या प्रश्नावरून उपस्थित तज्ज्ञ आणि निसर्गप्रेमींचे मतभेद झाले. मात्र चर्चेअखेर पुण्याच्या बाबतीत या विषाणूंची असलेली वेगळी ओळख आणि त्यांच्याबद्दल जनजागृती करण्याची असलेली गरज या निकषांवर विषाणू मानचिन्हाचा मार्ग मोकळा झाला.
‘बायोस्फीअर्स’ संस्थेचे संस्थापक सचिन पुणेकर म्हणाले, ‘‘एच१एन१ला जैविकदृष्टय़ा वेगळी अशी ओळख आहे. तसेच ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’ आणि ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ या पुण्यातील संस्थांनी या विषाणूचा संसर्ग, निदान आणि प्रतिबंध यासंबंधी जागतिक पातळीवर मोलाचे कार्य केले आहे. ही बाब लक्षात घेता एच१एन१ला विषाणू मानचिन्हाच्या स्पर्धेत स्थान मिळाले. तर पपया रिंगस्पॉट व्हायरस पपईच्या बागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान करत असल्यामुळे तो स्पर्धेत आहे. ‘विषाणू हानीकारक असल्यामुळे त्याला मानचिन्ह म्हणावे का,’ हा प्रश्न उपस्थित करण्यात आला असला, तरी विषाणूकडे एक जैविक घटक म्हणून पाहणे आवश्यक असून मानचिन्हाच्या किताबामुळे त्या विषाणूसंबंधी जनजागृती होण्यास मदत होऊ शकेल.’’

Story img Loader