सप्टेंबर महिन्यापासून सोमवापर्यंत (८ ऑक्टोबर) एकवीस रुग्णांचा स्वाइन फ्लू आजारामुळे मृत्यू ओढवला असून त्यापैकी सोळा रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षांतील स्वाइन फ्लूमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या एक्केचाळीस झाली आहे.

या वर्षांत १८८ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून ऑक्टोबर महिन्यात देखील लागण होण्याचे प्रमाण मोठे आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार एक सप्टेंबरपासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत एकवीस रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी झालेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत या रुग्णांच्या मृत्यूचे कारण स्वाइन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी नवीन सात रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. ५४६४ रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली, त्यापैकी दोनशे अकरा रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. बारा रुग्णांच्या थुंकीचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूचे एकशे बत्तीस रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांपैकी चौऱ्याण्णव रुग्ण वॉर्डमध्ये तर चौतीस रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. वर्षभरामध्ये सुमारे सात लाख बावीस हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील अकरा हजार दोनशे साठ रुग्णांना टॅमिफ्लू हे औषध देण्यात आले. एक हजार चारशे बत्तीस रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासण्यात आले असून त्यातील दोनशे नव्याण्णव रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे.  एकशे सात स्वाइन फ्लू रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे.

महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांमुळे अनेक रुग्ण उपचारांसाठी तेथे दाखल होतात, त्यामुळे मृतांची संख्या अधिक असली, तरी प्रत्यक्षात पुणे महापालिकेच्या कक्षेतील मृत रुग्णांची संख्या सोळा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र ताप, सर्दी, खोकला यांपैकी कुठलीही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.