दिवाळी संपूनही अजून सातत्याने थंडी जाणवत नसल्यामुळे शहरातील डेंग्यूचे प्रमाण ‘जैसे थे’च आहे. नोव्हेंबरमध्ये शहरात ४५ जणांना डेंग्यू झाला असून दर दिवशी सरासरी ६ जणांना डेंग्यूची लागण होत आहे. याउलट स्वाईन फ्लू मात्र ऑक्टोबरपासून ओसरल्याचे दिसून येत आहे. डासांमुळे पसरणारे मलेरिया (हिवताप) आणि चिकूनगुण्या हे ताप या वर्षी नियंत्रणात आहेत.
जानेवारीपासून आतापर्यंत शहरात ४८७ जणांना डेंग्यू झाला असून ४ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. पाणी साठून त्यात डासांची पैदास झाल्याबद्दल पालिकेने शहरात २५ ठिकाणी खटले दाखल केले आहेत. थंडी वाढत जाईल तसे डासांचे प्रमाण कमी होऊन त्याबरोबर हळूहळू डेंग्यू कमी होईल, असे मत पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. श्याम सातपुते यांनी व्यक्त केले. सध्या डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण मोठे दिसत असले तरी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुण्या हे तीनही ताप कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
डेंग्यूच्या रुग्णाने योग्य औषधोपचारांबरोबरच इतर काळजी घेणेही आवश्यक असल्याचे ससून सवरेपचार रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘डेंग्यू झालेल्या रुग्णाने इतर तापांच्या रुग्णांप्रमाणेच विश्रांती घ्यायला हवी. भरपूर पाणी पिणे आणि ‘क’ जीवनसत्व पुरेशा प्रमाणात घेणेही गरजेचे आहे. दातातून किंवा नाकातून रक्त आल्यास तत्काळ रुग्णालयात जाणे आवश्यक आहे.’’
या वर्षी ऑगस्टमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसली होती. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे २७५ रुग्ण आढळले असून ऑगस्टमध्ये या रुग्णांची संख्या ४२ होती. सप्टेंबरमध्ये स्वाईन फ्लूचे १७ रुग्ण आढलले असून ऑक्टोबरमध्ये ही संख्या ६ झाली. नोव्हेंबरमध्ये स्वाईन फ्लूचे केवळ २ रुग्ण सापडले आहेत. मलेरिया आणि चिकुनगुण्याचे रुग्ण सातत्याने सापडत असले तरी त्यांची संख्या नियंत्रणात आहे. मलेरियाचे या वर्षी १३३ रुग्ण आढळले असून चिकुनगुण्याचे ३५ रुग्ण आढळले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा