स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी पुण्याच्या ग्रामीण भागातील नागरिक शहरातील खासगी रुग्णालयातच उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. स्वाइन फ्लू रुग्णांची ग्रामीण भागातील आकडेवारी पाहता जानेवारीपासून आतापर्यंत आढळलेल्या जवळपास ९१ टक्के रुग्णांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. केवळ ९.९४ टक्के रुग्णांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले असून ही शासकीय रुग्णालयेही पुणे शहर व पिंपरी- चिंचवडमधील आहेत. पुण्याच्या शहरी भागातले चित्रही बदलले नसून पालिकेच्या नायडू व कमला नेहरु रुग्णालयात अजूनही व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना ससून किंवा खासगी रुग्णालयातच दाखल व्हावे लागत आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात जानेवारीपासून आतापर्यंत एकूण १८१ स्वाइन फ्लू रुग्ण आढळले. यातील केवळ १८ रुग्णांनी शासकीय रुग्णालयांत उपचार घेतले असून त्यातले सर्वाधिक म्हणजे ११ रुग्ण पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल होते. तर उर्वरित ७ रुग्णांनी शहरातील ससून, नायडू आणि एनआयव्हीच्या बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेतले. इतर सर्व १६३ रुग्ण पुणे व पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयात दाखल होते.
शहरातही वेगळी परिस्थिती दिसत नाही. मंगळवारी पुण्यात स्वाइन फ्लूमुळे रुग्णालयात दाखल असलेल्यांची आकडेवारी पाहता पालिकेच्या नायडू आणि कमला नेहरु रुग्णालयात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण दाखल नव्हता, तर ससूनमध्ये केवळ ४ संशयित रुग्ण दाखल होते. पालिकेकडे अतिदक्षता विभागाची सोय नसल्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण पालिका रुग्णालयात दाखल होत नसल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी सांगितले. ते म्हणाले,‘कमला नेहरु रुग्णालयात सध्या २४ वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णालयात रुजू झाले आहेत, पण ते आयसीयूसाठीचे नाहीत. आयसीयूसाठी १५ फिजिशियन्सची गरज लागणार आहे. बंधपत्रित फिजिशियन डॉक्टरांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते भरता आले नाहीत. आयसीयू पूर्ण तयारीनिशीच सुरू करावे लागत असून मनुष्यबळासाठी प्रयत्न करतो आहोत. पालिकेच्या नोंदींनुसार सध्या ४१ जणांना स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील १२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर जानेवारीपासून आतापर्यंत पुणे पालिकेने १०२२ स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद केली आहे.
—
‘‘पुण्याच्या ग्रामीण भागात मंचर, इंदापूर, बारामती, भोर अशा ५० ते १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची सोय आहे, शिवाय सर्व जिल्हा रुग्णालयातही व्हेंटिलेटर सुविधा आहे. पावसाळ्यातल्या किरकोळ आजारांसाठी लोक पहिल्यांदा खासगी डॉक्टरांकडे जात असल्यामुळे आम्ही तालुका आणि ग्रामीण भागातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांपर्यंत स्वाइन फ्लूवरील उपचारांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पोहोचवली आहेत. आजारी व्यक्तीने कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यावेत हा रुग्णांच्या पसंती व विश्वासाचाही विषय आहे.’’
– डॉ. एच. एच. चव्हाण, उपसंचालक, आरोग्य विभाग
स्वाइन फ्लूसाठी ग्रामीण भागातील नागरिकांची शहरातील खासगी रुग्णालयांकडेच धाव
पालिकेच्या नायडू व कमला नेहरु रुग्णालयात अजूनही व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना ससून किंवा खासगी रुग्णालयातच दाखल व्हावे लागत आहे
First published on: 24-09-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu patient hospital rural area