सध्या राज्यात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेल्या २६ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. शहरात नव्याने सापडणाऱ्या स्वाइन फ्लू रुग्णांची संख्याही वाढली असून पुण्यात चालू आठवडय़ात स्वाइन फ्लूचे १९ नवीन रुग्ण सापडले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात स्वाइन फ्लूच्या २६ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे. यात १० स्वाइन फ्लू रुग्ण पुणे पालिका क्षेत्रात, २ जण ससून रुग्णालयात, तर ४ रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात कृत्रिम श्वासोच्छवासावर उपचार घेत आहेत. या खालोखाल मुंबई आणि कोल्हापूरमध्येही पालिका क्षेत्रात अनुक्रमे ८ आणि २ स्वाइन फ्लू रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही ठिकाणी स्वाइन फ्लूच्या प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. पुणे पालिकेची चालू आठवडय़ातील आकडेवारी पाहता पाच दिवसांत स्वाइन फ्लूचे १९ नवीन रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारच्या ताज्या आकडेवारीनुसार सध्या पुण्यात २३ स्वाइन फ्लू रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यातील १० जणांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले आहे, आणखी ४ संशयित रुग्णांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात एकूण ८६३ स्वाइन फ्लू रुग्ण आढळले, यातील ९७ जणांचा मृत्यू झाला, तर ७४४ स्वाइन फ्लू रुग्ण पूर्णत: बरे झाले.

Story img Loader