स्वाइन फ्लूची पावसाळी साथ हळूहळू संपुष्टात येत असताना साथीच्या उरल्यासुरल्या प्रादुर्भावाचा त्रास पुण्यातच दिसून येत आहे. राज्यात पुणे आणि नागपूर विभागात स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांच्या संख्येत फारसा फरक नसला, तरी स्वाइन फ्लूमुळे कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेले जवळजवळ सर्व रुग्ण रुग्ण मात्र अजूनही पुण्यातले आहेत.
सध्या राज्यात ११० रुग्ण स्वाइन फ्लूसाठी रुग्णालयात उपचार घेत आहेत. राज्याच्या साथरोग विभागाच्या आकडेवारीनुसार यात सर्वाधिक म्हणजे ३१ रुग्ण पुणे विभागातील असून त्यातील पुणे पालिका क्षेत्रात २३ रुग्ण, ससूनमध्ये ३ रुग्ण व पिंपरी-चिंचवडमध्ये ५ रुग्ण दाखल आहेत. खालोखाल नागपूरमध्ये २७, मुंबई व ठाण्यात १८, नाशिकमध्ये १९ तर कोल्हापूरमध्ये १० रुग्ण अद्याप रुग्णालयात आहेत.
स्वाइन फ्लूमुळे कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या या साथीत सातत्याने पुण्यातच अधिक राहिली होती. साथ जवळजवळ संपत आलेली असतानाही पुणे पालिका क्षेत्रात १० स्वाइन फ्लू रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पालिका आणि लातूरमध्येही प्रत्येकी एका रुग्णाला व्हेंटिलेरवर ठेवावे लागले असून राज्यात इतर ठिकाणी स्वाइन फ्लू रुग्ण व्हेंटिलेटरवर नाहीत.
गरोदर मातांच्या लसीकरणाला पुण्यात सर्वाधिक प्रतिसाद
राज्य शासनाने सुरू केलेल्या गरोदर मातांच्या ऐच्छिक स्वाइन फ्लू लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद पुण्यात मिळाला आहे. पुण्यात १७ ठिकाणी शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये हे लसीकरण सुरू असून बुधवापर्यंत ६८१३ गरोदर मातांनी लस घेतली आहे. मुंबई व ठाण्यात अशी १७ लसीकरण केंद्रे असून तिथे ३००३ मातांचे, तर नागपूरला ८ केंद्रांवर २९७८ मातांचे लसीकरण झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘गरोदर मातांसाठीची लसीकरण केंद्रे साधारणत: जानेवारीपर्यंत सुरू राहतील. आता स्वाइन फ्लू हळूहळू कमी होत असला, तरी आताही लस घेतली तरी त्याचा परिणाम पुढे ८ ते १२ महिने मिळू शकतो.’