राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेल्या गरोदर स्त्रियांच्या तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या मोफत स्वाईन फ्लू लसीकरणाचा उपक्रम जगात पोहोचणार आहे. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद फार मोठा नसला तरी त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून संघटनेकडून तयार केल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल मोडय़ूल’साठी या उपक्रमाची माहिती मागवण्यात आली आहे.
संसर्गजन्य रोगांविषयीच्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले,‘स्वाईन फ्लू लसीकरणाबाबत डब्ल्यूएचओ कडून बनवल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल मोडय़ूल’साठी या उपक्रमाचे पुराव्यांवर आधारित सादरीकरण करण्यास सांगितले गेले आहे. लसीकरणाचे हे मॉडय़ूल देशात केवळ महाराष्ट्रातच असून हे सादरीकरण जागतिक स्तरावर प्रसिद्ध होईल.’ ही लस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी असून त्यांनी ती वाढवणे गरजेचे असल्याचा आग्रह समितीने धरला असल्याचेही त्यांनी सांगितले.
गरोदर स्त्रियांच्या मोफत लसीकरणाला जुलै २०१५ मध्ये सुरुवात झाली होती, तर डिसेंबरमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाबग्रस्तांचे लसीकरण सुरू झाले. या उपक्रमात आतापर्यंत राज्यात एकूण ३८,६४९ व्यक्तींनी स्वाईन फ्लू लस घेतली आहे.
गरोदरपणात स्वाईन फ्लू लशीचा परिणाम तपासणार
एनआयव्हीमार्फत संशोधन
राज्याच्या मोफत लसीकरण उपक्रमात ज्या गरोदर स्त्रियांना स्वाईन फ्लूची प्रतिबंधक लस देण्यात आली त्यांना लशीचा काय फायदा झाला हे तपासण्यासाठी एक संशोधन प्रकल्प हाती घेण्यास आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून हे संशोधन पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळेमार्फत (एनआयव्ही) केले जाईल, असेही डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘गरोदर स्त्रियांना स्वाईन फ्लू लशीपासून किती रोगप्रतिकारशक्ती मिळाली, त्यांच्या बालकांना फायदा झाला का, या गोष्टींबाबत संशोधन करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून शासनाच्या मान्यतेनंतर हे संशोधन सुरू होईल. एनआयव्ही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाचा त्यात सहभाग असेल.’’
राज्यातील स्वाईन फ्लूच्या मोफत लसीकरणाचा उपक्रम जगभर पोहोचणार!
गरोदर स्त्रियांच्या तसेच मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींच्या मोफत स्वाईन फ्लू लसीकरणाचा उपक्रम जगात पोहोचणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 07-02-2016 at 03:31 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swine flu world health organization