राज्यात या वर्षी एकही नवे महाविद्यालय किंवा नवा अभ्यासक्रम सुरू होणार नसल्याचे समोर येत आहे. या वर्षी नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाकडून विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. येत्या काळात पारंपरिक अकृषी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसाठीही बृहत आराखडा तयार करून त्यानुसारच महाविद्यालयांना परवानगी देण्याचे धोरण उच्चशिक्षण विभागाने स्वीकारले आहे.
एकीकडे अनेक महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत, काही शाखांसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत आहे. असे असतानाही दरवर्षी नव्या शैक्षणिक वर्षांत शेकडो नवी महाविद्यालये सुरू करण्यात येतात. अनेक नवे अभ्यासक्रमही विद्यापीठे आणि महाविद्यालये तयार करत असते. मात्र, वर्षांनुवर्षांची ही परंपरा या वर्षी खंडीत होणार आहे. या वर्षी राज्यात कोणतीही नवी महाविद्यालये, तुकडय़ा किंवा विद्याशाखा नव्याने सुरू करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने खोडा घातला आहे. नवी महाविद्यालये मंजूर करण्यात येणार नसल्याचे उच्च शिक्षण विभागाकडून विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. नव्या महाविद्यालयांबरोबरच तुकडी वाढ, नवे अभ्यासक्रम किंवा नवी विद्याशाखा सुरू करण्याच्या प्रस्तावालाही या वर्षी मान्यता न देण्याची भूमिका उच्च शिक्षण संचालनालयाने घेतली आहे. याबाबतचे परिपत्रकही विभागाने विद्यापीठांना पाठवले आहे.
या वर्षी राज्यातून साधारण चारशे नवे प्रस्ताव आले असल्याचे उच्च शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र, या संस्थांना आता महाविद्यालये सुरू करण्यासाठी पुढील वर्षांपर्यंत थांबावे लागणार आहे. गेल्या वर्षी राज्यातील महाविद्यालयांमध्ये ३० टक्क्य़ांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. काही विद्याशाखांना प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमधील स्पर्धा शिगेला पोहोचते, तर काही विद्याशाखांचे वर्ग ओस पडलेले असतात. त्याचप्रमाणे नव्या महाविद्यालयांचे बहुतेक प्रस्ताव हे शहरी भागातून येतात. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागात महाविद्यालयांची गरज अधिक असल्याचे दिसून येते. हा समतोल साधण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. यापुढे या बृहत आराखडय़ाप्रमाणेच महाविद्यालयांना परवानगी देण्यात येईल. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात येतील, असे उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा